‘सर्वोपचार’मध्ये रुग्ण सेवेचा भार इंटर्न्स, परिचारिकांवर
By admin | Published: May 4, 2017 02:31 PM2017-05-04T14:31:47+5:302017-05-04T14:31:47+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण सेवेचा भार मुख्यत्वे आंतरवासिता डॉक्टर आणि परिचारिका यांच्या खांद्यावरच असल्याचे चित्र आहे.
अकोला : केवळ अकोलाच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील गोरगरीब जनतेसाठी मोफत उपचाराचे मोठे केंद्र असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण सेवेचा भार मुख्यत्वे आंतरवासिता डॉक्टर आणि परिचारिका यांच्या खांद्यावरच असल्याचे चित्र आहे. प्रत्येक विभागासाठी असलेले वैद्यकीय अधिकारी येथे नावापुरतीच हजेरी लावत असल्याने रुग्णांच्या तपासणीपासून तर इतर सर्व प्रकारचे उपचार शिकाऊ डॉक्टर व परिचारिकांकडूनच केल्या जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
शासनाचे वेतन घेऊनही काही डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये कमी अन् स्वत:च्या रुग्णालयांमध्ये अधिक दिसून येतात. शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देऊन शासकीय वेतन लाटणाऱ्या डॉक्टरांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास शासनाने मज्जाव केला; परंतु अनेक डॉक्टर सर्रास वैद्यकीय अधिनियमाचे उल्लंघन करून स्वत:च्या रुग्णालयांमध्ये व्यवसाय करीत आहेत. एवढेच नाही, तर काही डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार, शस्त्रक्रिया करण्याचे सुचवितात. अनेक डॉक्टर केवळ नावापुरती हजेरी लावून, नंतर दिवसभर आपल्या रुग्णालयांमध्ये व्यस्त राहत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक कक्षात आंतरवासिता डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावरच रुग्णांची जबाबदारी असते.
रात्रपाळीत कक्षसेवक, अटेन्डंट राहतात गायब
आंतरवासिता डॉक्टर व परिचारिका रुग्णांना बरे करण्यासाठी सतत परिश्रम घेतात; मात्र काही कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा व कामचुकारपणामुळे परिचारिकांवर ताण वाढविला आहे. रात्रपाळीत अटेन्डंट, कक्षसेवक, स्वीपर, सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे; मात्र महिनाभरातून क्वचितच हे कर्मचारी उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत सर्वच कामाची धुरा परिचारिकांना सांभाळावी लागत आहे.