बार्शीटाकळी तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींचा प्रभारी कारभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:25+5:302021-05-20T04:19:25+5:30
महान येथे १५ ग्रामपंचायत सदस्य व राजंदा येथेही १३ ग्रामपंचायत सदस्य असल्याने एवढ्या मोठ्या सदस्यसंख्या असलेल्या व लोकसंख्या असलेल्या ...
महान येथे १५ ग्रामपंचायत सदस्य व राजंदा येथेही १३ ग्रामपंचायत सदस्य असल्याने एवढ्या मोठ्या सदस्यसंख्या असलेल्या व लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी नसणे ही मोठी गंभीर बाब असून, लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पिंजर येथील ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत असून, येथे १७ सदस्य आहेत. गेल्या दोन वर्षांपासून येथे प्रभारी ग्राम विकास अधिकारी होते. दरम्यान, त्यांनीसुद्धा बदली करून घेतल्यामुळे पुन्हा येथे प्रभारी ग्रामसेवकाची नियुक्ती केली आहे. नियुक्ती केलेल्या ग्रामसेवक यांच्याकडे इतरही ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने ते पूर्ण वेळ पिंजर येथे देऊ शकत नाहीत. त्यामुळे गावातील नागरिकांच्या समस्या व विकासकामे खाेळंबली आहेत. त्यामुळे नागरिकांसोबतच ग्रामपंचायत सदस्यसुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
वित्त आयोगाचा निधी पडून!
येथील ग्रामपंचायतीला १४ व १५ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असूनसुद्धा कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने हा निधी ग्रामपंचायत खात्यामध्ये पडून आहे. पिंजर व महान येथील नागरिकांच्या घरकुलांचे तसेच नियमकुलाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, तर अतिक्रमणाचे प्रश्न प्रलंबित आहेत.
एका ग्रामसेवकाकडे तीन गावांचा प्रभार
सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागातसुद्धा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून, यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित विभागांनी आदेश काढून लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शामियाना टाकून लसीकरणाची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायतीकडे दिली आहे. अशातच एक ग्रामसेवक तीन गावे कसे सांभाळणार व कुठे उपस्थित राहणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.