श्रीसूर्या घोटाळ्यातील मुख्य आरोपींवर आरोप निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 02:10 PM2020-01-03T14:10:31+5:302020-01-03T14:10:38+5:30
समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी या दोघांवर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. शर्मा यांच्या न्यायालयात गुरुवारी दोषारोप निश्चित करण्यात आले. यावेळी सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी अकोल्यासह राज्यातील अनेक शहरांमधील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेल्या रकमेवर दामदुप्पट व भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले आहे. याप्रकरणी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
याच फसवणूक प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाणे आणि खदान पोलीस ठाण्यातही या दोघांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर समीर व पल्लवी जोशी या दोघांवरच गुरुवारी आरोप निश्चिती करण्यात आली असून, इतर सहा आरोपी मात्र या प्रक्रियेपासून दूरच आहेत. खदान व रामदासपेठ पोलिसांनी सदर सहा आरोपींवरील दोषारोपपत्रच न्यायालयात दाखल केले नसल्याने त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी या दोन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींच्यावतीने अॅड. आशिष देशमुख यांनी कामकाज पाहिले.
या सहा आरोपींचे दोषारोपपत्रच नाही!
मधुकर ददगाळ यांच्या तक्रारीवरून समीर सुधीर जोशी, पल्लवी समीर जोशी यांच्यासह त्याचे अकोल्यातील एजंट मोहन मुकुंद पितळे, मंगेशी मोहन पितळे, मुकुंद पितळे, शंतनू कुºहेकर, चंद्रशेखर कुºहेकर आणि आनंद जहागीरदार या आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील समीर आणि पल्लवी या दोघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे; मात्र रामदासपेठ आणि खदान पोलिसांनी इतर सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखलच केले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप निश्चिती अद्यापही बाकी असल्याची माहिती आहे.