तुषार पुंडकर हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:36 AM2020-06-10T10:36:38+5:302020-06-10T10:37:00+5:30

४७५ पानांचा समावेश असलेले दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात मंगळवारी दाखल केले.

Chargesheet filed in Tushar Pundkar murder case | तुषार पुंडकर हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल

तुषार पुंडकर हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल

Next

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अकोट पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर ४७५ पानांचा समावेश असलेले दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात मंगळवारी दाखल केले. या दोषारोपपत्रात सात आरोपींचा समावेश असून, ६ आरोपी कारागृहात आहेत, तर एक आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सदर आरोपीचा शोध सुरू केला आहे.
अकोट शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनीही दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केल्याने पोलिसांना या प्रकरणात तपास करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती. या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ व अकोटचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी अकोट शहरातील रहिवासी पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना २६ मार्च रोजी अटक केली. त्यानंतर निखिल सेदानी आणि गुंजन चिचोळे या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या पाच आरोपींसह शाहबाज खान आणि शुभम जाट हे दोघेही आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात एकूण सात आरोपी असल्याचे उघडकीस आल्यानंतर यामधील पवन सेदानी, श्याम नाठे, अल्पेश दुधे, निखिल सेदानी आणि गुंजन चिचोळे या पाच आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली, तर शाहबाज खान हा दुसऱ्या एका प्रकरणात कारागृहात आहे आणि शुभम जाट हा अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजकीय वलय असलेले हे हत्याकांड झाल्यानंतर विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते; मात्र पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा तसेच अकोट पोलिसांनी या प्रकरणात तपास करून तब्बल ४७५ पानांचे दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये सात आरोपींचा समावेश असून, पुढील सुनावणीस लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Chargesheet filed in Tushar Pundkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.