चारमोळी गावकर्यांचे काम प्रेरणादायी!
By admin | Published: May 7, 2017 07:34 PM2017-05-07T19:34:54+5:302017-05-07T19:34:54+5:30
चारमोळी या १२५ घर आणि साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावाने पाणी फाउंडेशन कपमध्ये सहभाग नोंदविला आहे.
पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप: जलसंधारण कामांची केली पाहणी
अकोला : तीन डोंगर पाषाण फोडून पाण्याचे चर, मातीचे ढाळ, पाणी मुरविण्यासाठी दगडी गोट्यांचे असे शेकडो बांध बांधून वॉटर कपसाठी फक्त तीन हजार घनमीटर पाणी अडवायचे लक्ष्य असताना, चारमोळी या गावाने श्रमदानातून चक्क त्याच्या दुप्पट सहा हजार घनमीटर पाणी अडेल एवढे काम केले आहे. हे काम राज्यातील जनतेच्या डोळय़ात अंजन घालणारे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले. पातूर तालुक्यातील बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या चारमोळी या गावात झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी केल्यानंतर गावकर्यांशी बोलताना डॉ. पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. चारमोळी या १२५ घर आणि साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावाने पाणी फाउंडेशन कपमध्ये सहभाग नोंदविला आहे. ८ एप्रिलपासून संपूर्ण गाव श्रमदानासाठी डोंगरकड्यावर काम करीत आहे. देवकाबाई जगदीश खुळे, सिद्धार्थ अशोक कवडे, मुरलीधर राघोजी शेळके, रामदास नामदेव शेळके यांना वॉटर कप फाउंडेशनकडून प्रशिक्षण मिळाले. प्रशिक्षण मिळाल्यापासून गावाला एकत्र करणे, पाण्याचे महत्त्व सांगून ही चळवळ उभी करून रोज पहाटेपासून ३00 लोक गावशिवारात श्रमदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे काम यांनी केले. वॉटर कपसाठी केवळ तीन हजार घनमीटर काम अपेक्षित असताना यांनी सहा हजार घनमीटर काम केले आहे. शेकडो चर, अनेक दगडी बांध, मातीचे बांध निर्माण करून डोळे दिपावेत एवढे चांगले काम या ग्रामस्थांनी केले आहे. हे काम पाहण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील शनिवारी सकाळी या गावाच्या शिवारात आले. तीन मोठमोठय़ा डोंगरावर पाषाण फोडून तयार केलेले चर, मातीचे बांध, डोंगरातून येणारे पाणी गोटे टाकून जागोजागी निर्माण केलेले बांध पाहिले आणि गावकर्यांच्या पाठीवर शाबासकीचा हातच फिरविला नाही, तर या कामासाठी लागणारी मदत जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने देण्याचे आश्वासन दिले. दूध उत्पादन वाढीसाठी जनावरे, या गावातील महिलांच्या बिबे फोडण्याच्या व्यवसायासाठी यंत्र पुरविण्याचे काम शासन करेल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी तहसीलदार रामेश्वर पुरी, गावचे सरपंच, तालुका कृषी अधिकारी, विविध विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.