‘सीएचबी’चे मानधन महाविद्यालयांकडून सुटेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 01:15 PM2019-12-01T13:15:20+5:302019-12-01T13:15:33+5:30
मानधनाचा हा निधी महाविद्यालयांकडून सुटत नसल्याने अद्यापही ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अकोला : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना गतवर्षीचे मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली. सहा कोटींचे अनुदान मानधनासाठी आल्यावर उच्च व शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे ते महाविद्यालयांच्या खात्यात वळते करण्यात आले; मात्र मानधनाचा हा निधी महाविद्यालयांकडून सुटत नसल्याने अद्यापही ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
उच्च शिक्षण घेऊनही शिक्षकांना नोकरी नाही. तासिका तत्त्वावर मिळणाऱ्या मानधनातून सीएचबी शिक्षक कसेबसे उदरनिर्वाह करीत आहेत. राज्य शासनाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेशानुसार, सीएचबी प्राध्यापकांना महिन्याकाठी १५ हजार रुपये मानधनाचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आक्षेप सीएचबी प्राध्यापकांनी नोंदविला आहे. विभागातील १५२ महाविद्यालयांत सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. २०१८-१९ मधील सीएचबी प्राध्यापकांच्या थकीत मानधनासाठी सहा कोटी रुपये शासनाने पाठविले; परंतु नियोजनाअभावी ही रक्कम दिवाळीत मिळाली नाही. तत्कालीन सहसंचालक संजय जगताप यांनी आॅगस्टपूर्वी मानधन दिले जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु मध्यंतरी जगताप यांची बदली झाली आणि मानधनाचा विषय रखडला. त्यानंतर गतवर्षीचे ८२ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन प्राचार्यांच्या खात्यात जमा झाले होते; मात्र ६८ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन तांत्रिक कारणांनी रखडले होते. तांत्रिक त्रुटी दुरुस्तीनंतर बहुतांश महाविद्यालयांकडे हा निधी वळता करण्यात आला असूनही सीएचबी प्राध्यापकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.