‘रेमडेसिविर’ची स्वस्ताई नावालाच, लूट सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:35+5:302021-04-19T04:17:35+5:30
अकोला: रेमडेसिविरचा काळाबाजार राेखण्यासाठी शासनाने नव्याने दर निश्चित केले असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र ...
अकोला: रेमडेसिविरचा काळाबाजार राेखण्यासाठी शासनाने नव्याने दर निश्चित केले असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र ही स्वस्ताई नावालाच असून जिल्ह्यात रेमडेसिविरच्या नावाने रुग्णांची लूट सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिविरचीही मागणी वाढली आहे. शासकीय रुग्णालयात रेमडेसिविरचा काही साठा असला, तरी खासगी रुग्णालयांमध्ये गत काही दिवसांपासून रेमडेसिविरचा तुटवडा असल्याचे चित्र दिसून येत आहे. मान्यता प्राप्त कोविड रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयातही विना परवाना कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याने गरजूंना रेमडेसिविर मिळत नसल्याचे वास्तव आहे. याच स्थितीचा लाभ घेत काही विक्रेते जादा दराने रेमडेसिविरची विक्री करीत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने नव्याने दर निश्चित केले असून त्याची अमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देशही दिले आहेत. काही विक्रेते सोडल्यास या निर्देशांची जिल्ह्यात कुठेच अंमलबजावणी होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
जुन्याच दराने विक्री
खासगी रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांंना रुग्णालयाशी संलग्नित मेडिकलमधूनच रेमडेसिविर इंजेक्शन घ्यावे लागत आहे. या ठिकाणी रुग्णांना जुन्या दरानेच रेमडेसिविरची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
इंजेक्शन संपले बाहेरून आणा
रुग्णालयात रेमडेसिविर उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणण्याचा सल्ला दिला जात आहे, मात्र बाहेर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जादा दराने इंजेक्शन खरेदी करावे लागत असल्याचे वास्तव आहे.
नातेवाईकांची वणवण
शहरातील अनेक खासगी रुग्णालयात विना परवानगी कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांसाठी रेमडेसिविर सहजासहजी उपलब्ध होत नाही. अशा रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरच्या काळ्याबाजाराला बळी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
व्हेंटिलेटरवरील रुग्ण वाढले
जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बहुतांश रुग्ण हायफ्लो ऑक्सिजनवर असून काहींना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयात एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ३३८६३
सध्या उपचार सुरू असलेले - ४६१६
व्हेंटिलेटरवरील रुग्ण - १६०