सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल रेंगाळली!
By Admin | Published: September 2, 2016 12:53 AM2016-09-02T00:53:18+5:302016-09-02T00:53:18+5:30
अमरावती विभागात केवळ १८ टक्के डाळीची उचल करण्यात आली.
संतोष येलकर
अकोला, दि. १: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी ११ हजार ६९९ क्विंटल तूर डाळ उपलब्ध झाली. उपलब्ध तूर डाळीच्या साठय़ातून १ सप्टेंबरपर्यंत केवळ २ हजार १२६ क्विंटल ४0 किलो (१८.१८ टक्के ) तूर डाळीची रास्त भाव दुकानदारांनी उचल केली. त्यामुळे अमरावती विभागात सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल रेंगाळली आहे.
तूर डाळीच्या भाववाढीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. शासनाच्या ६ ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार १0३ रुपये प्रती किलो दराने शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ वितरित करण्यासाठी शासनामार्फत जिल्हानिहाय तूर डाळीचा साठा मंजूर करण्यात आला. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यासाठी गत पंधरा दिवसांपूर्वी ११ हजार ६९९ क्विंटल तूर डाळीचा साठा विभागातील शासकीय धान्य गोदामात उपलब्ध झाला. दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत सवलतीच्या दरातील तूर डाळ उपलब्ध होताच बाजारातील तूर डाळीचे दर घसरले. सवलतीच्या दरातील तूर डाळ १0३ रुपये प्रती किलो दराने वितरित करण्यात येत असताना, तीच डाळ बाजारात ६२ ते ७५ रुपये प्रती किलो दराने मिळत आहे. दरातील तफावतीमुळे शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरातील तूर डाळ परवडणारी नसल्याने, रास्त भाव दुकानदारांनी सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल करण्यास नकार दिला. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सवलतीच्या दरातील ११ हजार ६९९ क्विंटल तूर डाळीचा साठा शासकीय धान्य गोदामांमध्ये उपलब्ध झाला असला तरी, उपलब्ध साठय़ातून १ सप्टेंबरपर्यंत पाचही जिल्ह्यात केवळ २ हजार १२६ क्विंटल ४0 किलो तूर डाळीची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती विभागात सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल रेंगाळल्याची स्थिती आहे.
उपलब्ध साठा उचल करण्यात आलेली तूर डाळ!
जिल्हा उपलब्ध साठा केलेली उचल
अकोला २0३९ ५९७
अमरावती २९४१ ४0.३२
बुलडाणा २१३९ ६९८
वाशिम १९२१ ५0९
यवतमाळ २६५९ २८२.0८
......................................................................
एकूण ११६९९ २१२६.४0