प्लॉट विक्रीच्या नावाखाली महिलेस साडे सहा लाखांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 07:57 PM2022-01-29T19:57:55+5:302022-01-29T20:16:46+5:30
Crime News : ६ लाख ५९ हजार हडपले असल्याची तक्रार सिताबाई नाईक यांनी २५ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.
मूर्तिजापूर : रेल्वेतून सेवा निवृत्त झालेल्या महिलेकडून प्लॉट विक्रीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे घेऊन आतापर्यंत ६ लाख ५९ हजाराचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. गिताबाई नाईक यांनी पोलीसात २५ जानेवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी, आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही.
शहरात जया वाकोडे नामक महिलेचे प्लॉट असून ते विक्री आहेत व प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही इसार पावती करा त्यासाठी जया डिगांबर वाकोडे व सतिश दज्जूका यांनी रेल्वेत सफाई कामगार म्हणून निवृत्त झालेल्या सिताबाई नाईक यांना वेळोवेळी पैशाची मागणी करुन त्यांच्या कडून आतापर्यंत ६ लाख ५९ हजार हडपले असल्याची तक्रार सिताबाई नाईक यांनी २५ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. सदर प्रकरण मूर्तिजापूर शहर पोलीसांकडे वर्ग करण्यात आले. परंतु गत ५ दिवसांपासून आरोपीस अटक करण्यात आली नाही.
उपरोक्त आरोपींनी त्यांच्या मालकीचे प्लॉट नसताना खोटे शेत सर्वे नंबर व प्लॉट नंबर देऊन इसार पावती करुन घेतली व सदर प्लॉट खरेदी करुन देतो असे सांगितले परंतु गत सात महिन्यांपासून उपरोक्त आरोपी भूलथापा देत आहेत. माहिती काढली असता त्यांच्या नावे कुठलेही प्लॉट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असल्याचे सिताबाई नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीवरून सतिश प्रभूदयाल दज्जूका व जया डिगांबर वाकोडे यांच्या विरुद्ध शहर पोलीसांत ४२० कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.