बाळापूर तालुक्यातील विद्यामंदिर शाळा संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:18 AM2018-01-24T02:18:20+5:302018-01-24T02:19:02+5:30
अकोला : बाळापूर तालुक्यातील जुना अंदुरा येथील विद्यामंदिर वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकांसह मुख्याध्यापकाविरुद्ध उरळ पोलिसांनी बाळापूर न्यायालयाच्या आदेशाने फसुवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारकर्ते गोपाल भगत यांनी केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर तालुक्यातील जुना अंदुरा येथील विद्यामंदिर वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकांसह मुख्याध्यापकाविरुद्ध उरळ पोलिसांनी बाळापूर न्यायालयाच्या आदेशाने फसुवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारकर्ते गोपाल भगत यांनी केला होता.
विद्यामंदिर वरिष्ठ प्राथमिक शाळा जुना अंदुरा या शाळेची सध्या कार्यरत असलेली कार्यकारिणी ही मूळ मध्यप्रांत आणि वर्हाड विद्यामंदिर कायदा १९३९ अन्वये गठीत नसल्यामुळे पूर्णत: बेकायदेशीर व अनधिकृत असल्याचा आरोप गोपाल नारायण भगत यांनी केला आहे.
या संस्थेची स्थापना १९३९ मध्ये झालेली आहे. या संस्थेने २0 ऑक्टोबर १९७१ मध्ये शाळेला दान मिळालेली १८५ एकर शेती ही जिल्हा परिषदेला सर्वानुमते ठराव पारित करून हस्तांतरीत केली होती. यासंदर्भात संचालक मंडळाने कुठलेही वैधानिक अधिकार नसताना शाळा बळकवण्याचा प्रकार केला, तसेच नियमबाह्य पदोन्नती ही दिल्याचा आरोप करीत या संचालक मंडळाने न्यायालयाची, शासनाची व समाजाची दिशाभूल केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी गोपाल भगत यांनी उरळ पोलिसात केली होती; परंतु उरळ पोलिसांनी हे प्रकरण शिक्षण विभागाकडे देण्याचा सल्ला गोपाल भगत यांना दिला होता. वास्तविक या प्रकरणात उरळ पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्याची गरज असतानाही भगत यांनाच समन्सपत्र बजावण्याचा प्रकार केला होता, त्यामुळे भगत यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करून संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी होती. त्यावर बाळापूर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून विद्या मंदिर वरिष्ठ प्राथमिक शाळेची सध्या कार्यरत असलेल्या कार्यकारिणीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश उरळ पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशाने उरळ पोलिसांनी विद्यामंदिर शाळेच्या कार्यकारिणीचे संचालक महादेव तुळशीराम ढंगारे, विश्वनाथ कालुजी वानखडे, वासुदेव पुंडलीक रोहानकर, जनार्दन महादेव भगत, रमेश दिनकर शेळके, उमेश प्रल्हादराव जाधव, संजय सीताराम अग्रवाल, सुरज लक्ष्मण बेंडे आणि संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सुनंदा जानराव डांगे यांच्याविरुद्ध कलम ४२0, ४६८, ४७१,४0९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
उरळ पोलिसांनी समन्स बजावून दिला होता सल्ला
विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या स्वयंघोषित व अनधिकृत व्यवस्थापनाकडून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत तसेच संचालक मंडळाने न्यायालयाची दिशाभूल करून शासनाची आणि समाजाची फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी उरळ पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांच्याकडे केली होती. उरळ पोलिसांनी या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तपास न करता मला सदरची तक्रार ही शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडे दाद मागावी, अशा प्रकारचे समन्सपत्र देऊन टाळाटाळ केल्याचा आरोप गोपाल भगत यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञालेखात केला आहे.
शिक्षण विभागाकडे तक्रार न करता तक्रारकर्ता हा सरळ पोलीस स्टेशनला आला होता. त्याला आम्ही हे प्रकरण शिक्षण विभागाकडे पाठवण्याचा लेखी सल्ला दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी तक्रार आल्यानंतर दुसर्याच दिवशी शिक्षण विभागाकडे पत्र पाठवून माहिती मागितली आहे. शिक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. शिक्षण विभागाकडून अद्याप अहवाल आलेला नाही.
- सोमनाथ पवार, ठाणेदार, उरळ पोलीस स्टेशन.