कोरकू आदिवासींना गंडविण्याचा गोरखधंदा चार वर्षांपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 01:31 PM2019-12-01T13:31:47+5:302019-12-01T13:32:01+5:30
पीक कर्जाच्या नावाखाली अडगाव परिसरातील कोरकू आदिवासी यांना कोट्यवधींनी गंडविण्याचा गोरखधंदा गत चार वर्षांपासून सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आदिवासींच्या पीक कर्ज प्रकरणी अडगाव बु. सेंट्रल बँकेत सावळा गोंधळ सुरू असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताने शनिवारी तेल्हारा-अकोट परिसरात खळबळ माजली. तक्रारकर्त्यांस हाताशी धरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक राजेश शिंगारी, निवृत्ती गणेशराव गेबड, चेतन गुहे, नारायण शांतिलाल जांभळे यांच्यासह एक मोठी टोळी चौकशीच्या भोवºयात अडकली आहे.
पीक कर्जाच्या नावाखाली अडगाव परिसरातील कोरकू आदिवासी यांना कोट्यवधींनी गंडविण्याचा गोरखधंदा गत चार वर्षांपासून सुरू असल्याची बाब समोर आली आहे. परिसरातील राजकीय पुढारी, फायनान्स एजंटची टोळी आणि सेंट्रल बँकेचे अधिकारी-कर्मचारी संगनमताने हा गोरखधंदा चालवित आहेत. ही बाबदेखील लीड बँकेच्या निदर्शनास आली आहे.
तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड आणि भिली येथील शेकडो अशिक्षित कोरकू आदिवासी शेतकऱ्यांना अडगाव बु. सेंट्रल बँकेने पीक कर्ज वाटले आहे. पीक कर्ज वितरणासाठी बँकेची विशेष टोळी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ही टोळीच शेतकºयाचा सातबारा, आठ अ, स्टॅम पेपर आदी संपूर्ण दस्तऐवज तयार करीत असे. टोळीकडून आलेल्या दस्तऐवजांना अग्रक्रम दिला जायचा. त्यामुळे ही टोळी सेंट्रल बँकेची अविभाज्य घटकासारखी झाली होती. दस्तऐवज तयार करण्याचे शुल्क, बँक अधिकाºयांची वरकमाईदेखील एजंटच वसूल करायचे. त्यामुळे टोळीच्या माध्यमातून आलेल्यांची कामेही तातडीने व्हायची. वाटपातील खिरपत कमी आल्याच्या मुख्य कारणातून हे बिंग फुटले अन् आता एकापाठोपाठ अनेक गंडविल्याचे प्रकरण समोर येत आहे. वादग्रस्त पीक कर्ज प्रकरणांची कागदोपत्री सावरासावर झाली असली तरी, दस्तऐवजांवरील सही-शिक्के ओरिजनल आहे का, हेदेखील तपासले गेले पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.
अन्यायग्रस्त आठ आदिवासी कोरकूंची पुन्हा तक्रार
वादग्रस्त प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ल्याने गजानन छगन सोळंके, प्रकाश छगन सोळंके, नाना बोबड्या दहीकर, पटेल बाब्या दही, गंगाधर मोलाजी कायदेकर, रामकिसन मोतीराम दहीकर व हिरा रामू गवते या आठ कोरकू आदिवासी शेतकºयांनी शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात नवी तक्रार दिली. त्यात १७ लाख रुपयांचे कर्ज काढून केवळ ६ लाख रुपये प्रत्यक्षात दिल्याचे म्हटले आहे.
हिवरखेड पोलिसांची भूमिका संशयास्पद
अतिरिक्त कर्ज काढून कमी रक्कम शेतकºयांना मिळत असल्याच्या एक नव्हे अनेक तक्रारी हिवरखेड पोलीस ठाण्यात येत असतानादेखील त्याची साधी चौकशी होत नाही. अशिक्षित आदिवासींना दमदाटी करीत आरोपींना पाठीशी घालणाºया पोलिसांची भूमिका यामध्ये संशयास्पद आहे.
वादग्रस्त बँक मॅनेजरची लवकरच उचलबांगडी
अव्वाचे सव्वा पीक कर्ज काढून आदिवासी शेतकºयांची पिळवणूक करणारे अडगाव सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राजेश शिंगारी यांची उचलबांगडी होत असून, तातडीने येथे अकोल्यातील अधिकारी पाठविले जाण्याचे संकेत आहेत. कोरकू आदिवासींना गंडविण्याचा गोरखधंदा चार वर्षांपासून सुरू आहे.