कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक!
By admin | Published: March 7, 2016 02:31 AM2016-03-07T02:31:08+5:302016-03-07T02:31:08+5:30
बोनार्क कंपनीच्या नावाने केला कोट्यवधीचा घोटाळा; एजंट अरुण पांडे ‘नॉट रिचेबल’.
शेगाव (जि. बुलडाणा): उत्तर प्रदेशातील नोएडा येथील बोनार्क बिझनेस सोल्युशन प्रा.लि. नामक कंपनीकडून झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एजंटने शेगाव शहर व परिसरा तील शेकडो गोरगरीब नागरिकांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. फसवणुकीची रक्कम बुलडाणा जिल्ह्यात १ कोटीच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील बोनार्क बिझनेस सोल्युशन प्रा. लि. कंपनीमार्फत साडेसहा हजार रुपये भरल्यास तत्काळ ५६ हजार ५00 रुपयांचे कर्ज मिळणार, असे आमिष दाखवून अरुण पांडे या कथित एजंटने बचत गटाच्या नावाखाली शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांकडून प्रत्येकी ६ हजार ५00 रुपये जमा केले. त्यांना कर्जाच्या रकमेपोटी स्वत:च्या सहीचे ५६ हजार ५00 रु पयांचे धनादेशही दिले; मात्र धनादेश वटविण्यासाठी गेलेल्यांना सेन्ट्रल बँकेत सदर खात्यात पैसा नसल्याचे संबंधित बँकेकडून सांगण्यात आले. बँकेत धनादेश वटत नसल्याचे पाहून अनेकांनी पांडेचे घर गाठून पैशाची मागणी केली; परंतु त्याने या लोकांना आज देतो, उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ केली. यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना खातेदारांमध्ये निर्माण झाली. त्यातच ५ मार्च रोजी या कंपनीकडून बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा येथे एकच कार्यालय असल्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने ज्या लोकांनी अरुण पांडे यांच्याकडे कर्ज मिळावे याकरिता पैसे भरले, त्यांच्या मनात धडकी भरली आहे. काही जणांनी तातडीने अरुण पांडेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पांडे ह्यनॉट रिचेबलह्ण आहे. विशेष म्हणजे अर्जदारांमध्ये महिलांचाच मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. सदर कंपनीचे कार्यालय शेगाव शहरात भूतबंगला परिसरात सुरू होते; मात्र धनादेश वटवल्या जात नाही आणि अर्जदारांना देण्यासाठी पैसे नाहीत या कारणाने सदर कार्यालय आता बंद असल्याचे फसवणूक झालेल्या महिला सांगत आहे.
दोन दिवसांपूर्वी संगम नगर येथील काही महिला अरुण पांडेच्या सहीचे धनादेश घेऊन पो.स्टे.ला गेल्या होत्या. त्यावेळी ठाणेदार बाविस्कर यांनी त्यांना धनादेश बँकेत टाका आणि तो बाऊन्स झाल्यास पो.स्टे.ला तक्रार द्या! असा सल्ला दिला होता. अर्जदारांमध्ये विशेषत: मध्यमवर्गीय व अशिक्षित नागरिकांचाच समावेश असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सखोल चौकशीअंती स्पष्ट होणार
एकूणच या प्रकरणी आशा यादव यांच्यासह इतर महिलांनी आपली फसवणूक झाल्याची पो.स्टे.ला दिलेली तक्रार, बोनार्क कंपनीकडून जिल्ह्यात नांदुरा येथे एकच कार्यालय असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे अरुण पांडे यांचीही पोलीस स्टेशनला बोनार्क कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार यामुळे सध्यातरी याप्रकरणी संभ्रम निर्माण झाला आहे. फसवणूक कोणी केली, हे पोलीस चौकशीअंती निष्पन्न होणार आहे.
तीन महिने झाले तरी कर्ज मिळाले नाही
पैसे गोळा करून तीन महिने झाले आहेत. सुरुवातीला शहरातील भूतबंगला परिसरातील कार्यालय उघडे असायचे; पण मागील काही दिवसांपासून हे कार्यालय बंद आहे. पांडे व त्याच्या इतर साथीदारांचे भ्रमणध्वनीही बंद आहेत. पैसे भरताच कर्ज काढून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते; पण त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आता पर्यायच नाहीत, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.