नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By admin | Published: October 14, 2015 12:32 AM2015-10-14T00:32:01+5:302015-10-14T00:32:01+5:30
शेगाव येथील घटना; तीन आरोपींना अटक.
शेगाव(जि. बुलडाणा): : पोलिस दलात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून २ लाख रुपये घेणार्या तिघांना शेगाव शहर पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी पैसे घेताना पकडले तसेच फिर्यादीवरुन या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. शेगाव येथील सुदामा नगरात राहणारे मोतीराम तायडे यांना पोलिस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यांना ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच मोतीराम तायडे यांच्याकडून १ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेतले होते व उर्वरित २ लाख रुपये १२ ऑक्टोबर रोजी शेगाव येथील आनंद सागर समोर आणून द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने मोतीराम तायडे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे शेगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे, पोहेकाँ आनंदा वाघमारे, गजानन धोंडगे, नापोकाँ महादेव इंगळे, मपोकाँ भावना पोते यांच्या पथकाने १२ ऑक्टोबर रोजी सापळा रचून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे शे.जमाल शे.गुलाम (वय ५५) रा.कान्हेरी गवळी ता.बाळापूर, श्रीमती निता नाटेकर (वय ३२) रा.सुंदरखेड बुलडाणा, मंगल बद्रीनाथ थोरात (वय २४) रा.चांडक ले-आऊट बुलडाणा यांना पकडले. या प्रकरणी मोतीराम तायडे यांच्या फिर्यादीवरुन शेगाव शहर पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपींविरुध्द कलम ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास शेगाव शहर पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.