कर्ज देण्याच्या नावाखाली हजारोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:00 AM2019-12-10T11:00:46+5:302019-12-10T11:00:55+5:30
फसवणूक झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलेगाव : तीन लाखांचे कर्ज सहज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली आलेगाव येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ दत्तात्रय भडांगे याने पशुवैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. दरम्यान, वृत्तपत्रात जाहिरातींमध्ये त्याला सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करणारी जाहिरात दिसली. जाहिरातीनुसार सौरभ याने १४ नोव्हेंबर रोजी एका मोबाइलवर संपर्क केला. त्याने पशुपालनासाठी ३ लाखांचे कर्ज हवे असल्याचे सांगितल्यानंतर त्याला व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कागदपत्रे पाठविण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्याने कागदपत्र पाठविल्यानंतर पुढील आठवड्यात त्याला कर्ज मंजूर झाले असून, त्यासाठी १० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कर्जाची रक्कम मोठी असून, जीएसटी भरण्यासाठी ११ हजार २०० रुपयांचा धनाकर्ष पाठविण्याचे सांगण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी कर्ज मंजूर झाले असले तरीही त्यासाठी विमा आवश्यक असून, त्याकरिता ९ हजार २५० रुपये पाठविण्याचे सांगण्यात आले.
२६ नोव्हेंबरपर्यंत सौरभने ३२ हजार ९५० रुपये नागपूर येथील पंडित शेषराव झाटे याच्या खात्यात भरले. त्यानंतर कर्ज मंजूर झाले असून, दोन-चार दिवसात पैसे मिळतील, असे सौरभला सांगण्यात आले; मात्र तेव्हापासून सौरभला देण्यात आलेला मोबाइल क्रमांक बंद असल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या सगळ्या प्रकारानंतर अखेर सौरभने चान्नी पोलिसांत तक्रार दिली आहे. चान्नी पोलिसांनी या प्रकरणणी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, गजानन पोटे सुनील भाकरे करीत आहेत.
अनेक युवकांचा समावेश
सुशिक्षित बेरोजगार युवकांना कर्ज देण्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधणाºयाने केवळ सौरभ भडांगे यालाच फसविले, असे नाही. सौरभसारखे अनेक बेरोजगार तरुण या सापळ्यात अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करणे गरजेचे आहे.
नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. खात्री करूनच व्यवहार करावा. सौरभ भडांगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गणेश वनारे,
ठाणेदार, चान्नी