पोस्ट आॅफिसमधील बंद आधार केंद्रांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:38 PM2019-05-20T14:38:01+5:302019-05-20T14:38:09+5:30
प्रत्येक आधार केंद्रातून किती आधार अपडेट झाले आणि नवीन आधार किती तयार झाले, याची माहिती घेतली जात आहे.
अकोला : शहरातील बहुतांश पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र बंद, असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणताच बंद आधार केंद्रांची चाचपणी सुरू झाली आहे. प्रत्येक आधार केंद्रातून किती आधार अपडेट झाले आणि नवीन आधार किती तयार झाले, याची माहिती घेतली जात आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अकोल्यातील पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. सातत्याने आधार केंद्र बंद असल्याची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे.
अकोला शहर परिसरात असलेल्या पोस्ट आॅफिसमधील बहुतांश आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची प्रचंड कोंडी होत आहे; मात्र सर्वसामान्य माणसांच्या या समस्येकडे लक्ष देण्यास प्रवर डाक अधीक्षकांना वेळ नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. शहरातील शिवाजी पार्क, जुने शहर, ताजनापेठ, जठारपेठ, कृषी नगर, गांधी नगर येथील पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र सेवा गत काही महिन्यांपासून अघोषितपणे बंद असतानादेखील वरिष्ठांकडून साधी दखल घेतल्या गेली नाही. ही बाब ‘लोकमत’ने अधोरेखित केल्यामुळे प्रवर डाक अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व आधार के ंद्रांतील अलीकडचा डेटा मागविला. त्यात वस्तुस्थिती ‘लोकमत’ने सांगितल्याप्रमाणे समोर आली. आता त्यावर काय उपाययोजना होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र बंद असल्याने अनेक अकोलेकरांचे आधार अपडेट आणि नवीन आधार कार्ड तयार करणे कठीण झाले आहे.