बालश्री सन्मानासाठी वाशिमच्या चेतनची दावेदारी
By admin | Published: September 16, 2014 06:47 PM2014-09-16T18:47:49+5:302014-09-16T18:47:49+5:30
वयाच्या सहाव्या वर्षापासून जन्मांध चेतनला समाजसेवेची गोडी
वाशिम : जिल्हा नेत्रदान प्रचार समितीचा ब्रँड अँम्बॅसिडर असलेल्या जन्मांध चेतन पांडुरंग उचितकरने राष्ट्रीय बालश्री सन्मान २0१४ साठी आपली दावेदारी सादर केली आहे. यासाठी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडफेरीसाठी राज्यातून दाखल झालेल्या ९ ते १६ वयोगटातील सव्वाशे बालकांमध्ये अंधांच्या विशेष प्रवर्गात चेतन हा एकमेव स्पर्धक होता, हे विशेष.
वाशिम तालुक्यातील केकतउमरा या गावचा रहिवासी असलेला चेतन जेमतेम १0 वर्षाचा आहे. वाशिमच्या सर्मथ विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या चेतनचे सामाजिक कार्य वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून सुरू झाले. विद्यार्थी आत्महत्या, नेत्रदान, कन्या भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती आदी विषयांवर जनप्रबोधन करताना चेतनने महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये भ्रमंती केली असून, १६४ ठिकाणी त्याचे कार्यक्रम झाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये चेतनने बालवयातच केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, राज्यभरात आजवर १२५ ठिकाणी त्याचे सत्कार करण्यात आले. लहान-मोठे जवळपास शंभर पुरस्कार मिळविणारा चेतन तबला व हार्मोनियम लिलया वाजवितो. वाशिम येथे १९ फेब्रुवारी २0१३ रोजी झालेल्या चाचा नेहरू बाल महोत्सवात चेतनला उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून सन्मानीत करण्यात आले. शास्त्रीय संगीतातील ३२ राग प्रवीण कंठाळे या त्याच्यासारख्याच जन्मांध गुरूकडून त्याने अवगत केले. चेतन केवळ कलेपुरता र्मयादित राहिला नाही. भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी अभ्यास करू न शकणार्या मुलांना त्याने कार्यक्रमाच्या पैशातून आतापर्यंत ५0 हजार रुपये किमतीच्या सौर कंदिलांचे वाटप केले आहे.
ग्रामीण भागातील मुलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून केकतउमरा परिसरातील ५00 मुलांना साबण व नेलकटरचे वाटपही चेतनने केले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून २५ अंध मुलांना रेडिओचे वाटप करण्याचे कामही चेतनने केले. बालश्री सन्मानाच्या माध्यमातून डोळसांचा अंधाप्रती असलेला दृष्टिकोन बदलविण्याची त्याची दृढ इच्छा आहे.