७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री अकोल्यात?
By admin | Published: September 27, 2016 02:53 AM2016-09-27T02:53:09+5:302016-09-27T03:39:39+5:30
जिल्हाधिका-यांनी घेतली अधिका-यांची बैठक.
अकोला, दि. २६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ ऑक्टोबर रोजी अकोला दौर्यावर येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अकोल्यातील संभाव्य दौरा कार्यक्रमासंबंधी नियोजनाची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी अधिकार्यांची बैठक घेतली. अकोल्यातील १५0 कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन आणि इतर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्यावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम अद्याप निश्चित नसला तरी, मुख्यमंत्री अकोला दौर्यावर येणार असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. त्यानुसार संभाव्य अकोला दौर्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करावयाच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व इतर कार्यक्रमांसंबंधी माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी विविध विभागाच्या अधिकार्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते, मनपा आयुक्त अजय लहाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. अकोल्यातील नियोजित कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा संभाव्य अकोला दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे.