विकासकामे, प्रश्नांचा मुख्यमंत्री घेणार आढावा
By admin | Published: December 9, 2014 12:37 AM2014-12-09T00:37:33+5:302014-12-09T00:37:33+5:30
जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक; माहिती सादर करण्याचे निर्देश.
अकोला: जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामे आणि प्रश्नांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती सादर करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सोमवारी अधिकार्यांच्या बैठकीत दिले.
राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात चालू आठवड्याअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामे आणि प्रश्नांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांसह प्रलंबित प्रश्नांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी उपाययोजनांची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाणार आहे. त्यानुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे आणि प्रश्नांबाबत सादरीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती संबंधित विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी उदय राजपूत, मिलिंद शेगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम.एच. तुपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक एम.डी. मालसुरे, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपअभियंता डी.एन. मडावी यांच्यासह भूजल सर्वेक्षण यंत्रणा व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*पूर्णा नदीचे दूषित पाणी; कारवाई करण्याचे निर्देश!
अमरावती येथील ह्यएमआयडीसीह्णमधील दूषित सांडपाण्यामुळे पूर्णा नदीचे पाणी दूषित झाले आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी आढावा बैठकीत दिले.
*पाणीटंचाई निवारणाचा घेतला आढावा!
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकार्यांनी घेतला. येत्या मे, जून महिन्यात जिल्ह्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, चाराटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील चारा दुसर्या जिल्ह्यात जाणार नाही, यासाठी जिल्ह्यात चाराबंदी करावी, तसेच जनावरांसाठी चारा डेपो उघडावे लागतील, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम.एस. तुपकर यांनी या बैठकीत दिली.