अकोल्यातील मोर्णा स्वच्छता मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक
By Atul.jaiswal | Published: February 20, 2018 06:49 PM2018-02-20T18:49:51+5:302018-02-20T19:08:43+5:30
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. परिवर्तन, जिदद, चिकाटी, कायापालट या शब्दांचा अर्थ काय आहे, हे समस्त अकोलेकरांनी मोर्णा नदी स्वच्छता अभियानातून दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशाच्या इतिहासात स्वच्छ मोर्णा मोहिमेचा समावेश ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. या अभियानाबददल आपण समस्त अकोलेकरांचे व प्रशासनाचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. या कौतुकाबददल जिल्हाधिकाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 जानेवारी 2018 पासून लोकसहभागातून सुरु झालेल्या या मोहिमेमुळे जलकुंभी व कचऱ्याने भरलेली ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ झाली आहे. मोर्णा स्वच्छता मोहिमेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे अकोलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री आपल्या मनोगतात म्हणाले की, परिवर्तन, जिदद, चिकाटी, कायापालट या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, हे समस्त अकोलेकरांनी मोर्णा नदी स्वच्छता अभियानातून दाखवून दिले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशाच्या इतिहासात स्वच्छ मोर्णा मोहिमेचा समावेश ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. एखादी मोहिम लोकचळवळ म्हणून स्वीकारली जाते, तेव्हा काय चमत्कार होतो, हे ही या निमित्ताने पुन्हा एकदा आपण अनुभवतो आहोत, या अभियानाबददल मी समस्त अकोलेकरांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. प्रशासनानेसुध्दा हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. प्रशासन आणि नागरिकांच्या हातात हात घालून काम करण्याच्या या प्रयत्नांना मा. पंतप्रधानांनी देखील गौरविले आहे. मला विश्वास आहे की, हे अभियान लवकरच पूर्णत्वाला जाईल आणि आपण स्वत: पूनर्जिवीत केलेली नदी म्हणून अकोल्यातील जनतेचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम…! या निमित्ताने एक आवाहन करावेसे मला वाटते, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयाने असे एक अभियान हातात घ्यावे, राज्यातील हे 36 अभिनव प्रयोग संपूर्ण देशाला दिशादर्शन करतील. जलयुक्त शिवार सारखे लोकसहभागाचे मॉडेल आज अनेक राज्य स्वीकारत आहेत. आज विविध क्षेत्रात, विविध आघाडयांवर आपले राज्य प्रगती करीत आहे. अनेक क्षेत्रात आपण अग्रणी आहोत. जल, जमीन आणि जंगल यांच्या संरक्षणात, संवर्धनात आपण पुढाकार घेऊ आणि पर्यावरण रक्षणाचा जगापुढे आदर्श ठेवू. अकोल्यातील स्वच्छ मोर्णा अभियान निश्चित या प्रयत्नातील पहिला टप्पा म्हणून इतिहासात कोरला जाईल, यात माझ्या मनात शंका नाही, या अभियानासाठी झटणाऱ्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा…!