मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:45 AM2018-02-10T01:45:17+5:302018-02-10T01:46:27+5:30
अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या ८५ कि.मी.रस्त्यांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उर्वरित ११0 कि.मी. रस्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून, त्यांची मंजुरी मिळताच अनेक गावे मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच या रस्ता कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यांनी अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील अनके गावे रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्गाला जोडण्यासाठी १९0 कि.मी. रस्त्यांचा प्रस्ताव तयार करून तातडीने शासनाकडे पाठविला होता. यासाठी निधीही मंजूर झाला असून, कामासही लवकरच प्रारंभ होणार आहे. उर्वरित १९५ कि.मी. मध्ये २८ रस्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला असून, यासाठी ८३ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. गतवर्षीही या योजनेंतर्गत जिल्हय़त २३ रस्ते मंजूर झाले होते. या रस्त्यांचे काम ७0 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम मे २0१८ पर्यंत पूर्ण होणार आहे. सन २0१६-१७ आणि सन २0१७-१८ मध्ये मंजूर झालेले रस्ते पूर्ण झाल्यानंतर जिल्हय़ातील बहुतांश गावे ना.डॉ. पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाशी जोडल्या जाणार आहेत.
पहिल्या टप्यातील गावे
पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील धोतर्डी, वाकी, नावखे, गोणापूर, बोरगाव, सोनाळा, येळवण. अकोट तालुक्यातील बळेगाव जोड रस्ता, उमरा ते मक्रमपूर, नेव्होरी खुर्द. बाश्रीटाकळी तालुक्यातील गालटेक ते साखरविरा, फेट्रा, देवधरी ते धोतरखेड. बाळापूर तालुक्यातील हाता ते निंबा, वझेगाव पोच मार्ग, स्वरूपखेड रस्ता. मूर्तिजापूर तालुक्यातील राज्य महामार्ग ते शिवन ते धानोरा बु.रस्ता, राज्य महामार्ग ते शेलुबाजार ते एंडली जिल्हा हद्दीपयर्ंत. पातूर तालुक्यातील खानापूर रस्ता, देऊळगाव ते भानोस रस्ता, तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा ते भांबेरी रस्ता, निंबोळी जोड रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांसाठी ५७ कोटी ११ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, या रस्त्यांच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महत्त्वाची ठरत आहे. येणार्या काळात जिल्ह्यातील एकही गाव रस्त्याविना राहणार नाही, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. रणजीत पाटील, पालकमंत्री, अकोला