मुख्यमंत्र्यांच्या ‘ टिष्ट्वट’चा ‘आकडा’ यंत्रणांना गवसेना!
By Admin | Published: July 6, 2017 01:10 AM2017-07-06T01:10:52+5:302017-07-06T01:54:32+5:30
जिल्हा बँकेचे ५६७२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र : मुख्यमंत्री म्हणतात, १ लाख ११ हजार ६२५ शेतकरी पात्र ठरलेत; राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहितीच नाही
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेल्या माहितीनुसार, बँकेचे जिल्ह्यातील केवळ ५ हजार ६७२ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असून, राष्ट्रीयीकृत बँकांकडून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अद्याप सादर करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘टिष्ट्वट’ करून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या माहितीत अकोला जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र १ लाख ११ हजार ६२५ शेतकऱ्यांचा ‘आकडा’ संबंधित यंत्रणांना गवसत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्यातील थकबाकीरदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असलेले शेतकरी आणि ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. त्यानुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३० जून रोजी सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेचे अकोला जिल्ह्यातील केवळ ५ हजार ६७२ शेतकरी थकबाकीदार असून, त्यांच्याकडे १८ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यामुळे बँकेचे ५ हजार ६७२ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अद्याप जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडे सादर करण्यात आली नसल्याने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडून जिल्ह्यातील थकबाकीदार आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्याप जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आली नाही; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत सोमवारी रात्री टिष्ट्वट करून, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हानिहाय शेतकऱ्यांची माहिती जाहीर केली असून, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ६२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे दर्शविण्यात आले. थकबाकीदार आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने सादर केलेली माहिती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अद्याप माहिती सादर करण्यात आली नसताना, मुख्यमंत्र्यांच्या ‘टिष्ट्वट’मध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ६२५ शेतकऱ्यांचा हा ‘आकडा’ संबंधित यंत्रणांना गवसत नसल्याची स्थिती आहे.
नव्या निर्णयानुसार जिल्हा बँकेचे १९८५३ शेतकरी ठरणार कर्जमाफीसाठी पात्र!
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केला. त्यानुसार सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. या नवीन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार १९ हजार ८५३ शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. यापूर्वी शासनाच्या २८ जूनच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ५ हजार ६७२ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्राप्त माहितीनुसार बँकेचे जिल्ह्यातील ५ हजार ६७२ शेतकरी थकबाकीदार असून, ते कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडून अद्याप प्राप्त झाली नाही.
-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)