राज्यातील पाणी-चारा टंचाई निवारणाचा मुख्य सचिव घेणार लेखाजोखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:03 PM2019-04-30T14:03:05+5:302019-04-30T14:03:10+5:30
अकोला: राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत.
- संतोष येलकर
अकोला: राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत. त्यासाठी ३ मे रोजी मुख्य सचिव संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
दुष्काळी परिस्थितीत राज्यातील विविध भागात पाणी आणि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, जनावरांसाठी पाणी आणि चाराटंचाईचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा ३ मे रोजी राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत. या आढावा बैठकीला राज्यातील विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आढावा बैठकीत पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसह टंचाई निवारणासाठी निधी मागणीचा आढावादेखील घेण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची घेणार माहिती!
सन २०१८-१९ मधील टंचाई कालावधीत गत आॅक्टोबर २०१८ पासून राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीज देयकांची अदायगी यासंदर्भातही मुख्य सचिव आढावा बैठकीत माहिती घेणार आहेत.
जिल्हानिहाय मागविली माहिती!
राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्य सचिव घेणार असल्याने, संबंधित मुद्यांची जिल्हानिहाय माहिती शासनाच्या पाणीपुरवठा विभागासह विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मागविण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत माहिती सादर करण्यात आली आहे.