बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाइल्ड लाइन १०९८’ आज अकोल्यात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:00 AM2019-02-09T11:00:13+5:302019-02-09T11:00:18+5:30
अकोला: महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने अकोल्यात चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनचा शुभारंभ होत आहे.
अकोला: महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने अकोल्यात चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनचा शुभारंभ होत आहे. उद्घाटन उद्या शनिवार ९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष सुगत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चाइल्ड लाइन १०९८ या प्रकल्पाला भारत सरकारची मान्यता आहे. चाइल्ड लाइनबाबत बाल न्यायलय अधिनियम २०१५ यामध्ये कलम २ (२५) तसेच कलम ३१ (१)(३) मध्ये उल्लेख आहे. हा प्रकल्प तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला या संस्थेद्वारे संपूर्ण अकोला जिल्ह्यात राबविला जाणार आहे. चाइल्ड लाइन १०९८ ही काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाऱ्या मुलांसाठीची २४ तास चालणारी राष्ट्रीय आपत्कालीन मोफत फोन सेवा आहे. महिला व बालविकास केंद्रीय मंत्रालयाचा चाइल्ड लाइनला आधार आहे. चाइल्ड लाइन राज्य सरकार, एनजीओ, अलाईडसिस्टिीम आणि कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेले असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.
हरविलेले, सापडलेली, आश्रयाची गरज असणारे, अत्याचारग्रस्त, वैद्यकीय मदतीची गरज असणारे, धोक्याच्या ठिकाणी काम करणारी, अनर्थकारी परिस्थितीत सापडलेली मुले, काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असलेल्या चिमुकल्या मुले व मुलींना चाइल्ड लाइनची मदत होणार आहे. विपरीत परिस्थितीत असलेली बालके आढळल्यास नागरिकांनी चाइल्ड लाइनला १०९८ या क्रमांकावर फोन लावून बालकाची मदत करू शकतात. अनेक वेळा विपरीत परिस्थितीत उद्भवल्यास पोलिसांचे तत्काळ पोहचणे शक्य नसते. अशा वेळी नागरिकांनी निडर होऊन त्या बालकाची मदत करावी. जर पोलिसात तक्रार केली तर आपल्यावरच पोलीस कारवाई करतील, अशा गैरसमजातून अनेक नागरिक बालकांची मदत करीत नाहीत; परंतु अशा नागरिकांना पोलीस यंत्रणा नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही भय मनात न ठेवता अशा बालकांच्या मदतीसाठी पुढे येऊन १०९८ वर फोन करू न संबंधित यंत्रणेला सजग करावे. अकोल्यात यापूर्वी १०९८ हेल्पलाइन सुरू होती; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही हेल्पलाइन बंद झाली. आता तिक्ष्णगत संस्थेमार्फत ही हेल्पलाइन बालकांच्या कल्याणार्थ सुरू करण्यात आली असून, अविरत राहील, अशी ग्वाही यावेळी संजय सेंगर यांनी दिली. पत्रकार परिषदेला विष्णुदास मुंडोकार, श्रीकांत पिंजरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.