अकोल्यातील मुलीचा अमरावतीत बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:10 AM2020-07-10T10:10:55+5:302020-07-10T10:11:03+5:30
अमरावती महिला व बालकल्याण संरक्षण विभाग तसेच वलगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील शिवसेना वसाहतमधील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या मामाचे गाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आष्टी येथे सुरू असतानाच अमरावती महिला व बालकल्याण संरक्षण विभाग तसेच वलगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला. तसेच दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून हा विवाह मुलगी ८ महिन्यांनी १८ वर्षांची झाल्यानंतर करावा, अशा सूचना करून तसा कबुली जबाब घेण्यात आला.
शिवसेना वसाहतमधील एका १७ वर्षीय मुलीचा साक्षगंध सोहळा ६ जुलै रोजी झाल्यानंतर तिचा विवाह सोहळा ९ जुलै रोजी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातकुली तालुक्यातील आष्टी येथील मुलासोबत होणार असल्याची माहिती अकोला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांना मिळाली त्यांनी तत्काळ या संदर्भात अमरावती येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांना या संदर्भात लेखी पत्राद्वारे कळविले. डबले यांनी वलगाव पोलीस आणि चाइल्ड लाइन पथकाला सोबत घेऊन आष्टी येथे बाल विवाह सुरू असतानाच धडक दिली. सदर विवाहाचे संस्कार सुरू होण्यापूर्वीच तीनही पथक दाखल झाल्याने हा विवाह थांबविण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलीचे वय तपासले असता ती १८ वर्षाला ८ महिने कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्यासंदर्भात दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून हा विवाह मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर करण्याच्या सूचना केल्या. सदर मुलगी १८ वर्षांची होण्यापूर्वी विवाह केल्यास दोन्ही कुटुंबीयावर गुन्हा दाखल करण्याचीही माहिती त्यांना दिली. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांना आता मुलगी १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याचे संमतिपत्र त्यांना दिले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा बाल विवाह रोखण्यात आल्याची माहिती बाल कल्याण विभागाने दिली.
बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यासह कुठेही अशा प्रकारे बाल विवाह किंवा अत्याचार होत असेल तर त्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला देण्यात यावी किंवा चाइल्ड व पोलिसांना माहिती दिल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल.
- अजय डबले
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अमरावती