जिल्हा परिषदेच्या शाळेत चिमुकलीचा विनयभंग, पाेषण आहाराचा मदतनीसच आराेपी
By आशीष गावंडे | Published: July 6, 2024 11:59 PM2024-07-06T23:59:20+5:302024-07-07T00:00:13+5:30
याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाइकांनी सिव्हील लाइन पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर ५० वर्षीय आरोपीविरूध्द विनयभंगासह पोस्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला: शहरातील एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पाेषण आहाराचे वाटप करणाऱ्या मदतनीसाने एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाइकांनी सिव्हील लाइन पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर ५० वर्षीय आरोपीविरूध्द विनयभंगासह पोस्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जिल्हा परिषद शाळेत इयता चाैथ्या वर्गामध्ये नऊ वर्षीय चिमुकली शिकते. विनयभंग करणारा आरोपी व त्याची पत्नी शालेय पाेषण आहार अंतर्गत शाळेत खिचडी तयार करुन वाटप करतात. ४ जुलै रोजी दुपारी आरोपी चंद्रमणी चव्हाण पिडित चिमुकलीला खिचडी तयार करण्याच्या खोलीत घेऊन गेला व तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार चिमुकलीने तिच्या घरी नातेवाईकांना सांगितल्यानंतर या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार सिव्हील पोलिसांनी ५ जुलै राेजी आरोपी चंद्रमणी चव्हाण याच्या विराेधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४,७५ व सहकलम ७,८ पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. आराेपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे करीत आहेत.
चिमुकली म्हणाली शाळेत जात नाही
आराेपीने मुलीचा विनयभंग केल्यामुळे ती भयभित झाली हाेती. दाेन दिवस झाले ती शाळेत का जात नाही,असे आइने विचारले असता तीने घटनेचा उलगडा केला. त्यानंतर कुटुंबियांनी पाेलिसांत तक्रार केली.
मुख्याध्यापकाने पाठवला अहवाल
शाळेत घडलेल्या प्रकारामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने तातडीने शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेत आराेपीचे काम बंद करुन त्याच्यावर कारवाइचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती आहे.