अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाने केली सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:57 PM2019-12-03T13:57:54+5:302019-12-03T13:58:23+5:30
मारूती व्हॅनमधून आलेल्या व तोंडाला कापड बांधलेल्या तिघा जणांनी मंदारच्या तोंडावर रूमाल झटकून त्याला बेशुद्ध केले आणि त्याला व्हॅनमध्ये डांबून अकोल्यात आणले
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट शहरातील यात्रा चौकातून अपहरण करण्यात आलेल्या १३ वर्षीय मुलाने अपहरणकर्त्या तिघांच्या तावडीतून सुटका करीत, थेट पोलीस कर्मचाऱ्याला गाठले आणि आपबिती कथन केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी नोंद घेतली.
अकोट शहरातील यात्रा चौकात राहणारा मंदार दीपक गोरे (१३) याला त्याच्या आईने सोमवारी दुपारी औषध आणण्यासाठी मेडिकल दुकानावर पाठविले; परंतु चौकातील दुकान बंद असल्याने, तो घरी जाण्यासाठी वळला. मारूती व्हॅनमधून आलेल्या व तोंडाला कापड बांधलेल्या तिघा जणांनी मंदारच्या तोंडावर रूमाल झटकून त्याला बेशुद्ध केले आणि त्याला व्हॅनमध्ये डांबून अकोल्यात आणले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अपहरणकर्ते मंदार गोरे याला घेऊन रेल्वे स्टेशनवर आले. व्हॅनमधून काढून त्याला रेल्वे स्टेशनच्या फलाटावर नेण्यासाठी त्यांनी मंदारच्या तोंडावर पाणी शिंपडले. त्यामुळे तो जागा झाला. त्याला जवळच एक पोलीस कर्मचारी उभा असल्याचे दिसून आले. त्याने चाणाक्षपणे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून निसटून थेट पोलीस कर्मचाºयाला गाठले नव्हे तर तो चक्क त्या पोलीस कर्मचाºयाला बिलगला. नंतर त्याने पोलीस कर्मचाºयाला आपबिती कथन केली. पोलिसांनी लगेच अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते पसार झाले होते. पोलीस कर्मचाºयाने मंदारला पोलीस ठाण्यात आणून, त्याच्या वडिलांसोबत संपर्क साधला. वडील दीपक गोरे अकोल्यात आल्यावर, त्यांच्या ताब्यात मंदारला देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. मंदार अद्यापही काही बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याचे त्याच्या वडिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या कामी पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनीसुद्धा सहकार्य केले. (प्रतिनिधी)
अकोट व रेल्वे पोलिसांचा तपास
यात्रा चौकातून मंदारचे अपहरण केल्यानंतर अकोट शहर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अकोट पोलीस अपहरणकर्ते व मारूती व्हॅनचा तपास घेण्यासाठी सीसी कॅमरे तपासून पाहात आहेत. तसेच रेल्वे पोलीससुद्धा तपास करीत आहेत.