बालवैज्ञानिकांचे आविष्कार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:18 PM2020-02-28T14:18:10+5:302020-02-28T14:22:00+5:30
विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून बालवैज्ञानिकांचे समाजोपयोगी आविष्कार समाजासमोर येत आहेत.
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विज्ञानामुळे जगाची प्रगती झाली आहे. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन शोध लागत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्येसुद्धा विज्ञानाची आवड, जिज्ञासा निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असून, विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून बालवैज्ञानिकांचे समाजोपयोगी आविष्कार समाजासमोर येत आहेत. समाजाला उपयोगी ठरेल, असे आणि कल्पकता, चिकित्सा वृत्तीतून विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती मांडत आहेत. हे कौतुकास्पद आहे. विज्ञानाच्या अभ्यासातून काहीतरी शिकून त्याचा रोजच्या जीवनात अंमल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञानयुगात जगणे होय. ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’च्या निमित्ताने विज्ञानाच्या प्रयोगातून समाजोपयोगी प्रतिकृती तयार करणाºया अशाच काही बालवैज्ञानिकांच्या आविष्काराविषयी....
सार्थक वैभव कुचर - बायो टॉयलेट
सार्थक कुचर हा सेंट अॅन्स इंग्लिश स्कूल मूर्तिजापूरचा विद्यार्थी. सरकारी शौचालयांमध्ये अस्वच्छता असते. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीसुद्धा शौचालये अस्वच्छ असतात. ह्युमन वेस्ट जमा होते. ब्लॉकेजेस होऊन दुर्गंधी पसरते. यावर मात करण्यासाठी सार्थकने स्मार्ट बायो टॉयलेट बनवायचे ठरविले. बनविलेल्या स्मार्ट बाय टॉयलेटमध्ये कमीत कमी पाणी वापर होतो. त्यामधील बायो डायजेस्टर बॅक्टेरियामुळे ह्युमन रेसचे पाण्यामध्ये रूपांतर केले जाते. वायूचे मिथेन गॅसमध्ये हे रूपांतर केल्या जाते. हा वायू औद्योगिक आणि घरगुती कामासाठी वापरल्या जाऊ शकतो. कॉइन टाकला तर टायलेटचा दरवाजा उघडल्या जातो. यासाठी त्याला विज्ञान शिक्षिका मीनल मोहोकार यांचे मार्गदर्शन मिळाले.
ओम श्याम बावनेर- अॅग्रीकल्चर मशीन
ओम हासुद्धा सेंट अॅन्स इंग्लिश स्कूल मूर्तिजापूरचा विद्यार्थी. तो जांभा येथे राहतो. त्याचे वडील शेतकरी असल्याने, त्याचा शेतीशी संबंध आला. शेतामध्ये धान्य काढल्यानंतर जो कचरा कुटाराच्या स्वरूपात बाहेर पडतो, ते कुटार शेतामधून गोळा करण्यासाठी मजूर आणि वेळ लागतो. वडिलांचे आणि मजुरांचे श्रम कमी होतील, यासाठी त्याने अॅग्रीकल्चर मशीनची निर्मिती केली. ही मशीन व्याक्युम प्रेशर तत्त्वावर चालते. व्याक्युम प्रेशरचा आधार घेऊन जमा झालेले कुटार थेट मशीनद्वारे ट्रॅक्टरमध्ये भरले जाते. यामुळे पैशांची आणि वेळेची बचत होते. त्याची ही प्रतिकृती राज्य स्तरावर निवडल्या गेली. त्याला मुख्याध्यापिका सिस्टर रिता, शिक्षिका अनुराधा गावंडे व मीनल मोहोकार यांचे मार्गदर्शन मिळाले.
पूजा कडू- रोबोटिक टॉयलेट क्लीनर
पूजा गजानन कडू ही एस.आर. पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी. वर्षभरापूर्वी तिच्या आईचा अपघात झाला. त्यात पायाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्यांना टॉयलेटचा वापर करता येत नव्हता. कमोड वापर केला; परंतु कमोड अस्वच्छ व्हायचे. आईचा त्रास कमी करण्यासाठी तिच्या डोक्यात कल्पना सुचली आणि त्या कल्पनेतून टॉयलेट स्वच्छ करणाºया स्वयंचलित मशीनने जन्म घेतला. पूजाने विज्ञान शिक्षक डी. पी. गव्हाळे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत कमी खर्चात घरगुती कूलरच्या मोटारचा वापर, इतर साहित्याची जोडणी करून रोबोटिक टॉयलेट क्लीनरची निर्मिती केली. या प्रतिकृतीची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाली. हे रोबोटिक क्लीनर टॉयलेटची आतून-बाहेरून स्वच्छता करते.
मधुरा पोधाडे- सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल
मधुरा ही आरडीजी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी. महिला, मुली सॅनिटरी नॅपकीन वापरून उघड्यावर फेकून देतात. त्यामुळे कचरा, अस्वच्छता होते. या विचारातून मधुराने तापमानाचा अंदाज घेत, सौर ऊर्जा, विजेवर चालणारी ईकोफ्रेन्डली सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल मशीन तयार केली. त्यासाठी तिने कोळशाचा वापर केला. मशीनमध्ये पॅड टाकल्यास ते त्वरित नष्ट होतात आणि धूरही निर्माण होत नाही. यासाठी तिला शर्मिष्ठा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या प्रतिकृतीची राज्य स्तरावर निवड झाली.