अकोल्यातील बाजारपेठेतून ‘चायना’ मोबाइल हद्दपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:30 AM2020-07-13T10:30:26+5:302020-07-13T10:30:52+5:30
चिनी बनावटीच्या मोबाइलला ‘रेड सिग्नल’ दाखविल्यामुळे अकोल्यातील बाजारपेठेत मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारत-चीनमध्ये गलवान घाटीत निर्माण झालेल्या वादाच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या चिनी बनावटीच्या मोबाइलला ‘रेड सिग्नल’ दाखविल्यामुळे अकोल्यातील बाजारपेठेत मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांमधून भारतीय बनावटीच्या मोबाइलची मागणी वाढली असून, तुटवड्यामुळे किमतीमध्ये चांगलीच वाढ झाल्याची माहिती आहे.
संपूर्ण जगाला कोरोना विषाणूचा अभिशाप देणाºया चीनने गलवान घाटीत घुसखोरी केल्यामुळे भारतासोबतचे संबंध ताणल्या गेले आहेत.
त्याचा परिणाम चीनमधून आयात केल्या जाणाºया विविध साहित्यावर व मालावर झाला आहे. केंद्र शासनानेसुद्धा एकूण ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यासोबतच चीनमधून आयात करण्यात आलेल्या व ‘कस्टम’ मध्ये अडकून पडलेल्या सुमारे सात हजार करोड रुपयांच्या चिनी बनावटीच्या मोबाइलच्या बाजारपेठेतील वितरणाची परवानगी नाकारली आहे.
त्याचा परिणाम जिल्ह्यात मोबाइल क्षेत्रातील बाजारपेठेवरही झाल्याचे समोर आले आहे. बाजारपेठेत चिनी बनावटीच्या मोबाइलचा तुटवडा असल्यामुळे किमतीच्या दरातही सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात अठरा ते वीस कोटींची उलाढाल
मोबाइलद्वारे आॅनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाल्यामुळे मोबाइलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यात मोबाइल क्षेत्रातील उलाढालीवर झाला असून, मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात अठरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
ग्राहकांमधून भारतीय व इतर देशातील बनावटीच्या मोबाइलची मागणी वाढली आहे. लहान विद्यार्थ्यांसाठी टॅबची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. कमी किमतीच्या मोबाइलला ग्राहकांनी पसंती दिली आहे.
- अरुण आलिमचंदानी, मोबाइल डिस्ट्रीब्यूटर.
आॅनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मोबाइलच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. अचानक मागणी वाढल्याने मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला असून किमती वाढल्या आहेत.
- रितेश मिरजापुरे,
मोबाइल व्यावसायिक, अकोला.