पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात
By Atul.jaiswal | Published: March 16, 2023 05:37 PM2023-03-16T17:37:26+5:302023-03-16T17:37:40+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या गजानन पेठ येथील श्री अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक भले मोठे चितळ घुसल्याने खळबळ उडाली होती.
अकोला : पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले असतानाच येथील सुधीर कॉलनीजवळच्या गजानन पेठ येथील एका निवासी संकुलाच्या पार्किंगमध्ये मोठे चितळ घुसल्याची घटना गुरुवार, १६ मार्च रोजी घडली. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितळाला पकडून जंगलात सोडले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या गजानन पेठ येथील श्री अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक भले मोठे चितळ घुसल्याने खळबळ उडाली होती.
याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर रेस्क्यू चमूचे मानव वन्यजीव रक्षक बाळ काळणे, यशपाल इंगाले, आलासिंग राठोड, विठ्ठल पाटील, अक्षय खंडारे तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी चितळ एका कोपऱ्यात उभे असल्याचे त्यांना दिसले. चितळाला मोठे शिंग असल्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता पाहता वन विभागाच्या चमूने मोठ्या शिताफीने पकडले.
किरकोळ जखमी झालेल्या या चितळावर डॉ. चोपडे व डॉ. गावंडे यांनी उपचार केले. त्यानंतर वन विभागाच्या चमूने या चितळाला सुरक्षित अधिवासात सोडून दिले. चितळ शहरातील निवासी भागात घुसण्याचा प्रकार दुर्मिळ असला तरी पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीत येण्याची शक्यता असते, असे बाळ काळणे यांनी सांगितले.