चॉकलेटने दूर करा मनातील दुरावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:51+5:302021-02-09T04:20:51+5:30
अकोला : आयुष्यातील आनंदाचा प्रसंग व कुठल्याची शुभकार्याची सुरुवात ही गोड पदार्थ खाऊन केली जाते, तसेच प्रेमाची सुरुवातही ...
अकोला : आयुष्यातील आनंदाचा प्रसंग व कुठल्याची शुभकार्याची सुरुवात ही गोड पदार्थ खाऊन केली जाते, तसेच प्रेमाची सुरुवातही चॉकलेटने होते. मनाचा गोडवा किंवा मनातील दुरावा दूर करणारा, आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा दिवस म्हणजे चॉकलेट डे !
‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा करण्याच्या प्लॅन केलेल्या तरुणाईच्या खिशाला गुलाबाचे भाव दुपटीने वाढल्यामुळे या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 'रोझ डे'लाच झळ बसली. एका गुलाबाच्या फुलासाठी प्रेमवीरांना वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागले. तसेच चॉकलेट डेच्या दिवशीही ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. बाजारात ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी चॉकलेट्स उपलब्ध होत आहेत. पूर्वीसारखे आता २० पैसे, ५० पैसे गायब झाले म्हणून सर्वांत स्वस्त चॉकलेट एक रुपयाला आणी महागातील महाग चॉकलेट हजार, दोन हजार, पाच हजार... ग्राहकाचा खिसा बघून उपलब्ध आहेत. आज सर्वत्र प्रियकर, प्रेयसी, मित्र, मैत्रीण आणि बहीण-भाऊसुद्धा एकमेकांना चॉकलेट भरवताना दिसून येतील. व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. प्रपोज केल्यावर नकार-होकाराच्या द्वंद्वात फसलेल्या प्रेयसीला आणखी जवळीक देता यावी यासाठी गोडवा हवा म्हणून ‘चॉकलेट डे’ साजरा केला जातो.
------------------------------------------------------------------------
आरोग्याची घ्या काळजी!
‘चॉकलेट डे’च्या दिवशी एकमेकांना चॉकलेट भरवताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्य जपण्यासाठी मधुमेहींकरिता खास शुगर फ्री चॉकलेट्सही उपलब्ध आहेत. अनेकांनी आधीच ऑर्डर्सही दिल्याची माहिती व्यावसायिकाने दिली आहे. शहरात प्रसिद्ध दुकानांमध्ये तरुणाईची गर्दी उसळली आहे.