अकोला शहरात नाताळ हर्षोल्हासात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:07 PM2019-12-25T16:07:51+5:302019-12-25T16:07:57+5:30
अकोला शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला: जगाला प्रेम व शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस नाताळ बुधवार २५ डिसेंबर रोजी नाताळ सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अकोला शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच सर्वत्र नाताळ सणाची तयारी सुरु झाली. गृहसणाच्यावेळी सर्व खिश्चन कुटूंंबे आपापल्या घरांची स्वच्छता करतात. त्या काळात सर्व खिश्चन बधू भगिनी एकमेकांच्या घरी जावून प्रार्थना करतात आणि शुभेच्छा देतात. डिसेंबर महिना उजाडताच घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी देण्यास सुरुवात होते. पहिल्या पंधरवड्यातच नाताळासाठी कपड्यांची खरेदी, सणासाठी फराळाची तयारी सुरु होते. २० तारखेलाच सर्व घरे आणि चर्चेसना रोषनाई केली जाते. त्यानंतर सलग चार दिवस घरोघरी फिरुन अबालवृद्ध खिस्तजन्माची गाणी म्हणतात. त्यामध्ये सांताक्लॉजचा वेश परिधान केलेला व्यक्ती सर्व लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. २४ डिसेंबरला रात्री १० ते १२ वाजेदरम्यान सर्व चर्चेसमधून प्रार्थना सभांचे आयोजन केले गेले. रात्री १२ वाजता फटाके फोडून नाताळाचे जोरदार स्वागत करण्यात आले. बुधवार २५ डिसेंबर रोजी सर्व चर्चेसमधून सकाळी ९ वाजता प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व चर्चेसमधील धर्मगुरूंनी खिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांच्या आधारे खिस्त जन्मावर संदेश दिला. यावेळी संडेस्कुलच्या लहान मुलांनी खिस्त जन्मावर आधारित नाटिका, गीते, नृत्य सादर केली. तसेच तरुणसंघ आणि महिला संघाच्या सदस्यांनी खिस्तजन्माची गीते सादर केली. यावेळी नव्याने जन्मलेल्या बालकांचे अर्पण करण्याचा विधीही आयोजित करण्यात आला होता. प्रार्थनासभेनंतर सर्व खिस्ती बंधू भगिनी यांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सलग आठ दिवस सर्व चर्चेसमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचे खेळ, तरुणांचे आणि प्रौढांचे खेळ, महिलांचे खेळ यासोबतच बायबल क्वीझ स्पर्धा, सहभोजन, सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांंचा समावेश आहे. अकोला शहरातील अलायन्स मिशन आणि इतर मिशनची असे एकूण ८ चर्चेस असून, नाताळानिमित्त त्या चर्चेसवर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.
प्रभू येशुंच्या विचारांचे अनुकरण करा - रेव्ह.अघमकर
ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्च मध्ये रेव्ह. निलेश अघमकर यांनी पवित्र बायबल मधील वचनांच्या आधारे नाताळाचा संदेश दिला. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता प्रभू येशू यांच्या प्रेम, त्याग आणि स्नेहाच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.