अकोल्यात वातावरण बदलावर मंथन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 04:11 PM2020-02-18T16:11:44+5:302020-02-18T16:12:17+5:30
सध्या भेडसावत असलेल्या वातावरणावर, शेतीवर विपरीत परिणाम होत असून, या अनुषंगाने शास्त्रज्ञांचे मंथन सुरू आहे.
अकोला : वातावरण अनुरू प दिशादर्शक तंत्रज्ञान विकासावर दोन दिवसीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या परिषदेला देशातील शास्त्रज्ञ उपस्थित झाले आहेत. सध्या भेडसावत असलेल्या वातावरणावर, शेतीवर विपरीत परिणाम होत असून, या अनुषंगाने शास्त्रज्ञांचे मंथन सुरू आहे. शेतीचे आरोग्य तपासणे गरजेचे असून, मूलभूत गुणधर्मावर संशोधन आवश्यक असल्याचा सूर परिषदेत उमटला.
शेतीचा पोत बदलत असून, मातीतील आवश्यक घटक अनेक भागात कमी झाल्याचे निदर्शनात येत आहे. गंधक, जस्त व इतर पूरक घटक पूर्ण असल्यास पिकांचे उत्पादन वाढते. आता वातावरणात प्रचंड बदल होत असतानाचे चित्र आहे. या अनुषंगाने वातावरण अनुरू प दिशादर्शक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ.एस.के. चौधरी,डॉ.पी. चंद्रन, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तपस भट्टाचार्य, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए.एस. धवन, डॉ.व्ही.के. खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. चौधरी यांनी पीक उत्पादनासाठी माती हा महत्त्वाचा घटक असून, जमिनीच्या मूलभूत गुणधर्मावर संशोधन करणे अत्यंत आवशक असल्याचे नमूद केले. डॉ. चंदन यांनी मृद परीक्षण, सर्वेक्षण व तपासणी करू न जमीन व्यवस्थान करणे काळाची गरज असल्याचे मत मांडले. जमिनीचे आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर प्रथम जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी भूगर्भाचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे डॉ. भट्टाचार्य यांनी सांगितले. डॉ. धवन यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असून, सेंद्रिय शेती व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने त्यांनी केलेले संशोधन हे सरळ व सोप्या भाषेत वृत्तपत्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.
परिषदेला डॉ.पी.जी. इंगाले, डॉ.पी.आर. कडू,डॉ. नितीन कोंडे, डॉ.एस.डी. जाधव आदीसह राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या ३५० शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.