क्षयरोग नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावर मंथन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:45 PM2020-01-05T12:45:42+5:302020-01-05T12:45:49+5:30
महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांतील क्षयरोग रुग्ण शोधमोहीम अन् उपचारासंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग नियंत्रणासाठी बिकानेर येथे राष्ट्रीय स्तरावर मंथन होणार आहे. यानुषंगाने ९ व १० जानेवारी रोजी नॅशनल टास्क फोर्सच्या वेस्टर्न झोनची बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांतील क्षयरोग रुग्ण शोधमोहीम अन् उपचारासंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे.
देशभरात क्षयरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी क्षयरुग्ण शोधमोहिमेसोबतच नव्या आणि पुनरुपचारावरील क्षयरुग्णांना योग्य उपचार देऊन क्षयरोग सेवेची परिणामकारकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभरात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यांतर्गत देशभरात पाच झोन कार्यरत असून, वेस्टर्न झोनमध्ये महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांतील गत वर्षभरातील क्षयरुग्णांची स्थिती, तसेच वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमांविषयी मंथन केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ वैद्यकीय महाविद्यालयांमधील क्षयरुग्णांच्या उपचारासंदर्भात माहिती दिली जाणार असून, त्यामध्ये १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. ही बैठक नॅशनल टास्क फोर्सच्या वेस्टर्न झोनचे अध्यक्ष डॉ. सलील भारगव आणि आरोग्य विभाग क्षयरोग सहसंचालक डॉ. पद््मजा जोगेवार यांच्या मार्गदर्शनात होईल.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ९ व १० जानेवारी रोजी बिकानेर येथे वेस्टर्न झोनची बैठक होणार आहे. यामध्ये झोनमधील पाच राज्यांतील क्षयरुग्णांची स्थिती व त्यांच्या उपचारासंदर्भात मंथन होणार आहे. तसेच क्षयरुग्ण शोधमोहीम आणखी प्रभावी राबविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. - डॉ. शिवहरी घोरपडे,
अध्यक्ष, स्टेट टास्क फोर्स, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम.