पानठेल्यांवर सर्रास सिगारेट, तंबाखूची जाहिरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:34 PM2019-12-21T12:34:37+5:302019-12-21T12:34:51+5:30
कोटपा कायद्यानुसार, थेट कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई होत नाही.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची थेट जाहिरात करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, उत्पादन कंपन्यांमार्फत जिल्ह्यातील पानठेल्यांवर या उत्पादनांची थेट जाहिरात करीत आहेत. कोटपा कायद्यानुसार, थेट कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई होत नाही.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येते; मात्र दुसरीकडे तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांची सार्वजनिक ठिकाणी थेट जाहिरात केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोटपा कायद्यांतर्गत उत्पादक कंपन्यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाहिरात करणे अपेक्षित आहे; मात्र असे न करता उत्पादक कंपन्या सार्वजनिक ठिकाणी थेट तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात करताना दिसतात. हा प्रकार कायद्याने गुन्हा असला तरी, त्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही, हे वास्तव आहे. पोलिसांकडून होणारी कारवाई ही तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनाची वाहतूक करणाऱ्यांवर होते; मात्र उत्पादक कंपन्यांकडून जाहिरात होत असल्यास संबंधित कंपन्यांवर कुठलीच कारवाई होत नाही, हे विशेष.
पोलीस अन् अन्न व औषध प्रशासनाला कारवाईचे निर्देश
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी सोमवार ,१६ डिसेंबर रोजी तंबाखू नियंत्रण समितीची बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पानठेल्यांवर सिगारेट किंवा तंबाखूची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईचा आदेश दिला होता.
तालुका व गाव स्तरावरही समिती
शहरी भागासह ग्रामीण भागातही तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी तालुका आणि गावपातळीवर स्वतंत्र तंबाखू नियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती बीडीओ यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे.
तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात करणे कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला कारवाईबाबत निर्देश दिले होते.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.