ठाणेदारांनी विनयभंग तक्रारीला बगल दिल्याने नागरिक संतप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:20 AM2021-03-10T04:20:00+5:302021-03-10T04:20:00+5:30
आरोपी महेंद्र मुर्तडकर हा नेहमीच महिलेला त्रास द्यायचा. परंतु उगाच वाद नको म्हणून संबंधित महिलेने दुर्लक्ष केले. परंतु त्याचा ...
आरोपी महेंद्र मुर्तडकर हा नेहमीच महिलेला त्रास द्यायचा. परंतु उगाच वाद नको म्हणून संबंधित महिलेने दुर्लक्ष केले. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन महेंद्र मुर्तडकर याने गणेश सरोदे (कार्ला) याच्या माध्यमातून महिलेला निरोप पाठविला. त्यामुळे महिला संतप्त झाली आणि संबंधित महिलेने या प्रकाराची माहिती पतीला दिली. त्यानंतर वाद निर्माण झाला. या वादाची तक्रार देण्यासाठी महिला चान्नी पोलीस ठाण्यामध्ये दुपारी गेली.
पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार वाघ यांनी, महिलेला त्रास देणाऱ्या त्या महेंद्र मुर्तडकर याच्या एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या भावाला ठाण्यात बोलावून घेतले व प्रकरण आपसात मिटविण्यास सांगितले. राजकीय हस्तक्षेपामुळे तक्रार करण्यासाठी गेलेली महिला हतबल होऊन गावात परतली. परंतु तोपर्यंत या प्रकाराची माहिती गावामध्ये पसरली होती. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच, सायंकाळी ठाणेदार गावात पोहोचले. प्रकरण वाढल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत माहिती पोहोचली व सायंकाळनंतर या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सूत्रे हलायला लागली. दरम्यान, रात्रीच्या सुमारास नागरिक एकत्र जमल्यामुळे ठाणेदारांनी महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी महेंद्र दामोदर मुर्तडकर व गणेश सरोदे (कार्ला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महिला पतीला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. परंतु गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांचे त्यांना फोन आल्यामुळे ते घरी निघून गेले. आता पुन्हा महिला तक्रार नोंदविण्यासाठी आली. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
-राहुल वाघ, ठाणेदार चान्नी