वाडेगाव-अकोला मार्गावरील खडतर प्रवासाला नागरिक वैतागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:17+5:302021-06-17T04:14:17+5:30
राहुल सोनोने, वाडेगाव : वाडेगाव-अकोला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागत ...
राहुल सोनोने, वाडेगाव : वाडेगाव-अकोला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागत आहे. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाहीत. परिसरातील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करणे आता अडचणीचे ठरत आहे.
वाडेगाव परिसरात ३० ते ४० गावे येत असून या गावाचा जिल्ह्याला जोडणारा वाडेगाव-अकोला हा सोयीस्कर मार्ग आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वोपचार रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालय, खासगी रुग्णालये असल्याने वाडेगावसह परिसरातील ३० ते ४० गावांतील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याने मार्गक्रमण करावे लागते. तसेच सध्या कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड केअर सेंटर असल्याने ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिकेतून सेवा दिली जाते. मात्र वाडेगाव-अकोला दिंडी मार्ग नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या दोन-तीन वर्षांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
फोटो :
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधी ढीम्म!
या रस्त्यावरून जाताना, वाहनाची वाट तर लागतेच, शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे काही व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, तर लोकप्रतिनिधी ढीम्म आहेत. त्यामुळे दोन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. असा आरोप माजी पंचायत समिती सदस्य अफसर खान इसा खान यांनी केला आहे.
पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहन कसे न्यावे, असा प्रश्न पडला आहे. या रस्त्याकडे वरिष्ठ प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे.
- सुश्रुत भुस्कुटे, युवक वाडेगाव