कोरोना चाचणीकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:59+5:302021-04-01T04:19:59+5:30

अडगाव : अडगाव आरोग्य केंद्रांतर्गत १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. प्रशासनाने गावामध्ये कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. परंतु, ...

Citizens' backs to the Corona test | कोरोना चाचणीकडे नागरिकांची पाठ

कोरोना चाचणीकडे नागरिकांची पाठ

Next

अडगाव : अडगाव आरोग्य केंद्रांतर्गत १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. प्रशासनाने गावामध्ये कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. परंतु, शिबिराकडे नागरिकांनी पाठ फिरविली. फिरते पथकसुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने माघारी परतले.

चिखलगावात नागरिक बेफिकीर

चिखलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीर होत वावरताना दिसत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बोरगावात मास्कची मागणी वाढली!

बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. गावामध्ये मास्कची मागणी वाढली असून, विक्रेत्यांनीसुद्धा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध केले आहेत.

गावातील अतिक्रमण हटविण्याची मागणी

पारस : गावातील प्रमुख रस्त्यावर काही विक्रेत्यांनी टपऱ्या थाटून अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पारस ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाढीव वीज दर कमी करण्याची मागणी

चोहोट्टाबाजार : कोरोना संक्रमण काळात छुप्या वाढीव दरामुळे सध्या वीज बिलांच्या रकमा वाढलेल्या आहेत. यास वाढीव दराचे परिपत्रक रद्द करून जुन्या वीज दराप्रमाणे ग्राहकांना वीज बिले द्या, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

तामशी शिवारात उन्हाळी सोयाबीनची लागवड!

वाडेगाव : मागील खरीप पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. परंतु, अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तामशी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड करून आगळा प्रयोग केला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

तेल्हारा : तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिली आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

इंधन दरवाढ; यांत्रिक मशागत महागली

बार्शीटाकळी : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस येत असल्याचे दिसून येते.

धार्मिक कार्यक्रम सुरू करण्याची मागणी

तेल्हारा : तालुका विश्व वारकरी सेनेच्यावतीने बुधवार, दि. १७ ला तहसीलदारांना निवेदन देऊन कोरोना काळात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना नियम व अटीनुसार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली.

पशु-पक्ष्यांसाठी केली चारा-पाण्याची व्यवस्था

बोरगाव मंजू/वणी रंभापूर : सद्य:स्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दरम्यान, जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, पाणी नसल्याने भटकंती होत आहे. पशू व पक्ष्यांची तहान, भूक भागविण्यासाठी पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पशुपक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी!

अकोट : प्राथमिक उपचार केंद्र गोलबाजार व प्राथमिक उपचार केंद्र नंदीपेठ येथे लसीकरण सुरू करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

घुसर येथे पाणीटंचाई

म्हातोडी : येथून जवळच असलेल्या घुसर येथे गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे विशेषत: महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे.

भरारी पथकाची चोरट्यांना दहशत

बाळापूर : मालेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून वीजचोरी करणाऱ्यांवर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वीज चोरटे दहशतीत असून, भरारी पथकाची चांगलीच भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

चोहोट्टा येथून होतेय अवैध वाहतूक

चोहोट्टा : अकोट तालुक्यातील आडसूळमार्गे खासगी वाहनचालकांकडून अवैध वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून हा प्रकार सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण

हातरून : येथील आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांना दिली जात आहे. या लसीकरणाला प्रतिसाद लाभत असून, सोमवारपर्यंत परिसरातील ५० च्यावर नागरिकांनी ही लस टोचून घेतली.

Web Title: Citizens' backs to the Corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.