नागरिकांनो, कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:56 AM2020-08-22T10:56:15+5:302020-08-22T10:56:26+5:30
दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसू लागला आहे. अनेकांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे दिसू लागली आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाविषयी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी बहुतांश लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना सर्दी, खोकला आणि तापीचे लक्षणे दिसून येतात; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुप्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुप्फुसाचे लोब खराब झालेले असतात. येथूनच ‘आॅर्गन फेल्युअर’ची सुरुवात होते. हा धोका टाळण्यासाठी सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गरज असल्यास कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहनदेखील तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
९० टक्के रुग्ण घेतात उशिरा उपचार
रुग्णालयात दाखल होणारे ९० टक्के रुग्ण हे सर्दी, खोकला येऊन गेल्यावर जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा रुग्णालयात दाखल होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रुग्ण दाखल होतो, तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
खासगी दवाखान्यात प्रत्येक रुग्णाची नोंद
जिल्ह्यातील प्रत्येक लहान-मोठ्या दवाखान्यात जाणाºया रुग्णांची नोंद होत आहे. संबंधित रुग्णाचा पत्ता तसेच त्याचा संपर्क क्रमांकदेखील घेण्यात येत आहे. या पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.
अनेक रुग्ण उशिरा उपचारास सुरुवात करतात. तोपर्यंत त्यांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम झालेला असतो. कोरोनामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला