‘सीआयटीएस’ प्रशिक्षित उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:19 PM2020-05-04T17:19:34+5:302020-05-04T17:20:19+5:30
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे हे उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत,
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: देशभरात ४७ ठिकाणी प्रशिक्षण मिळत असलेल्या ‘सीआयटीएस’ अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेले राज्यातील पाच हजार विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये शिल्प निदेशक पदभरतीमधून डावलेले जात आहेत. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे हे उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, अशी माहिती शिल्प निदेशक प्रशिक्षित संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेश वाघारे यांनी दिली.
सद्य:स्थितीत राज्यातील शासकीय ‘आयटीआय’मध्ये ७९३२ पदे मंजूर आहेत. त्यातील ३९४० निदेशक सेवेत कार्यरत असून २६४६ पदे रिक्त आहेत. दरम्यान, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३ एप्रिल २०२० रोजी ७०० निदेशक पदभरतीसाठी अधिसूचना जारी केली. त्यात ‘सीआयटीएस’ अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांमधूनच पदे भरण्यात यावी, अशी मागणी शिल्प निदेशक प्रशिक्षित संघामार्फत केली जात आहे. डीजीटी, दिल्लीचा संदर्भ व न्यायालयाच्या आदेशानुसार आयटीआय निदेशक पदासाठी सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण केले असणे अनिवार्य आहे; मात्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जाहीर केलेल्या ७०० निदेशक पदभरती सूचनेमध्ये सीआयटीएस उमेदवारास ‘प्राधान्य’, असा उल्लेख करून आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांवर पुन्हा एकवेळ अन्याय होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
काय आहे सीआयटीएस प्रशिक्षण?
भारतात ४७ ठिकाणी सीआयटीएस अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण केंद्र आहेत. आयटीआय निदेशक पदासाठी अर्ज करताना सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण एक वर्षे कालावधीचे असून ते डीजीटी, दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येते. महाराष्ट्रातील सीआयटीएस प्रशिक्षित उमेदवारांची संख्या सुमारे पाच हजार आहे.
शिल्प निदेशक हे पद भरताना सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण केले असावे, असे डीजीटी (दिल्ली) आणि औरंगाबाद न्यायालयाने अनिवार्य केले आहे; मात्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने २०१४ साली पदभरतीच्या जाहिरातीत अशा उमेदवारांना केवळ ‘प्राधान्य’ म्हणून उल्लेख केला होता. त्याविरोधात संघटनेने आवाज उठविल्यानंतर पदभरती रद्द झाली. आता पुन्हा १३ एप्रिल २०२० रोजी काढलेल्या जाहिरातीत असाच प्रकार झाला असून हा सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण करणाºया उमेदवारांवर एकप्रकारे मोठा अन्याय आहे. तो खपवून घेतला जाणार नाही.
- राजेश वाघारे
राज्याध्यक्ष, शिल्प निदेशक प्रशिक्षित संघ, महाराष्ट्र