नोव्हेंबरमध्ये धावणार ‘सिटी बस’!

By admin | Published: September 29, 2016 01:52 AM2016-09-29T01:52:31+5:302016-09-29T01:52:31+5:30

पहिल्या टप्प्यात अकोला शहरासाठी २0 बसेसचा ताफा नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात दाखल होणार.

'City Bus' to run in November | नोव्हेंबरमध्ये धावणार ‘सिटी बस’!

नोव्हेंबरमध्ये धावणार ‘सिटी बस’!

Next

अकोला, दि. २८- महापालिका प्रशासनाची शहर बस वाहतूक सुविधा अडीच वर्षांपूर्वी बंद पडल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. ही प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर असून, नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अकोलेकरांच्या सेवेत २0 शहर बससेचा ताफा दाखल होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात उर्वरित १५ सिटी बसेस रस्त्यावर धावतील.
महापालिकेची सप्टेंबर २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या काळात पहिल्यांदा सिटी बस सेवा सुरू करण्यात आली होती. कालांतराने बस वाहतूक सेवेला घरघर लागली. भारिप-बमसंच्या तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या कार्यकाळात १८ सिटी बसपैकी रस्त्यांवर केवळ सात बस धावत होत्या. भंगार अवस्थेतील या बसला अपघात झाल्यास त्याची जबाबदारी महापौरांसह महापालिका आयुक्तांवर निश्‍चित होणार असल्याने, २0१४ मध्ये सर्वसाधारण सभेत महापौर ज्योत्स्ना गवई व तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शहर बस वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून बस सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांची चांगलीच कुचंबणा होत आहे.
बस सेवा बंद झाल्याचा फायदा घेत ऑटोचालकांनी भाडेवाढ केली, त्यामुळे मनपाची बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. शहरवासीयांची गरज ओळखून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रशासनाच्या सोयीचा करारनामा तयार करून निविदा अर्ज बोलावले. यामध्ये श्रीकृपा ट्रॅव्हल्स नागपूरच्यावतीने सर्वाधिक २ रुपये ११ पैसे प्रतिकिलोमीटर दराची निविदा प्रशासनाने मंजूर केली. संबंधित कंपनीकडून मनपाला वार्षिक ४६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.
संबंधित कंपनीकडून नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात २0 सिटी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, उर्वरित १५ बसेस डिसेंबरमध्ये शहरात दाखल होणार असल्याची माहिती आहे.

हमी नाहीच!

तत्कालीन भाजप-सेनेच्या कार्यकाळात शहर बस सेवा सुरू करणार्‍या संस्थेने खरेदी केलेल्या बसेसच्या कर्जासाठी बँकेत मनपाच्यावतीने हमी घेतली होती. कालांतराने त्या कर्जाचा भुर्दंड मनपा प्रशासनाला सहन करावा लागला. त्यामुळे नव्याने केलेल्या करारनाम्यात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हमी घेतली नाही, हे येथे उल्लेखनीय.
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना सुविधा
शहर बसमध्ये प्रवास करताना शासनाच्या निकषानुसार नागरिकांना तिकिटांच्या दरात सुविधा मिळणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध किंवा दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त क्रीडापटू आदींचा समावेश राहील.
३0 आसनी प्रवासी क्षमता
शहरात अकोलेकरांच्या सेवेमध्ये ३0 आसनी प्रवासी क्षमता असलेल्या तब्बल ३0 बसेस धावतील. उर्वरित पाच बसेस राखीव ठेवल्या जाणार आहेत. सिटी बसचा दर्जा उच्च प्रतीचा असावा, यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्यामुळेच श्रीकृपा ट्रॅव्हल्स कंपनीसोबत केलेल्या करारात टाटा ७0९ ई एक्स वाहन खरेदीची अट नमूद आहे. परिणामी वाहन खरेदीच्या किमतीत वाढ झाली असून, कंपनीला प्रतिवाहन सुमारे १७ लाख रुपये मोजावे लागतील, असा अंदाज आहे. कंपनीसोबत १0 वर्षांचा करार राहील.
 

Web Title: 'City Bus' to run in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.