एलईडीच्या प्रकाशात लखलखणार शहर
By admin | Published: December 30, 2015 02:11 AM2015-12-30T02:11:56+5:302015-12-30T02:11:56+5:30
पाच कोटींच्या निधीला अर्थमंत्र्यांची हिरवी झेंडी; प्रशासकीय घडामोडींना वेग.
आशिष गावंडे / अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २0 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर या रस्त्यांवर एलईडीच्या प्रकाशाचा लखलखाट होणार आहे. आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एलईडी दिव्यांसाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. त्याला अर्थमंत्र्यांनी हिरवी झेंडी दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या स्तरावर प्रशासकीय घडामोडींना वेग आल्याची माहिती आहे. अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने १५ कोटींचे अनुदान दिले होते. या अनुदानातून प्रमुख १८ मार्गांची दुरुस्ती होत आहे. शहराच्या विविध भागांतील इतरही प्रमुख रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता, २५ कोटींचा विशेष निधी देण्याची मागणी आमदारद्वय गोवर्धन शर्मा व रणधीर सावरकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी २0 कोटी रुपये नगरविकास विभागामार्फत प्राप्त झाले. या निधीतून ६४ विकासकामे प्रस्तावित करण्यात आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व मनपा आयुक्त अजय लहाने यांनी विकासकामांच्या प्रस्तावाची छाननी करून अंतिम प्रस्ताव शासनाकडे पाठविले. या प्रस्तावांना शासनाने मंजुरी दिली. मध्यंतरी या रस्त्यावर प्रकाशमान पथदिवे लावण्यासाठी आ. शर्मा व आ. सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनुदानाची मागणी केली असता, त्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश लोकप्रतिनिधींना दिले होते. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यांनी पाच कोटींच्या या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती आहे.