शहरात होणार एलईडीचा झगमगाट!
By admin | Published: June 13, 2016 01:52 AM2016-06-13T01:52:58+5:302016-06-13T01:52:58+5:30
एलईडीसाठी कंपन्या सरसावल्या; मनपाकडे प्रस्ताव
अकोला: शहरातील मुख्य रस्त्यांवर एलईडीच्या प्रकाशमान पथदिव्यांमुळे झगमगाट होण्याचे दिवस आता दूर नाहीत. महापालिका प्रशासनाला एलईडीसाठी १0 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडे काही शासकीय कंपन्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावावर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सकारात्मक संकेत दिल्याची माहिती आहे. महापालिका प्रशासनाने वीज बचत करण्याच्या उद्देशातून शहरातील मुख्य रस्त्यांवर सीएफएल लाइट लावले. २00६ पूर्वी शहरात पिवळ्य़ा सोडियम पथदिव्यांचा वापर होत असे. अत्यंत प्रकाशमान असलेल्या सोडियम लाइटमुळे विजेचा जास्त वापर होऊन त्याचे देयक प्रशासनाला द्यावे लागत होते. यावर उपाय म्हणून सीएफएल लाइटचा पर्याय समोर आला. मात्र, सीएफएलच्या पथदिव्यांमुळे लख्ख प्रक ाश मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एका पथदिव्यात चार नळ्य़ा लावल्या जातात. यापैकी बहुतांश वेळा दोन किंवा तीन नळ्य़ा बंद राहत असल्याने अकोलेकरांना रस्त्यांवर अंधुक उजेडाचा सामना करावा लागत आहे. सायंकाळ झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पथदिव्यांचा झगमगाट होणे अपेक्षित असताना अंधुक उजेड पडतो. या सर्व बाबी लक्षात घेता, आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्य रस्त्यांवर एलईडी लावण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. आ. शर्मा यांच्या प्रस्तावानुसार शासनाने १0 कोटी रुपये निधी मंजूर केला. एलईडी लाइटसाठी प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त झाल्यामुळे भविष्यात मुख्य रस्त्यांवर लख्ख पथदिव्यांचा झगमगाट पाहावयास मिळणार, हे निश्चित झाले. एलईडी लाइट बसवण्यासाठी बाजारात नामवंत असणार्या अनेक कंपन्या तयार आहेत. अशातच काही शासन मान्यता असलेल्या कंपन्यांनी मनपाकडे एलईडीचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.