शहर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 01:45 AM2017-04-14T01:45:12+5:302017-04-14T01:45:12+5:30
अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत होणाऱ्या शहर पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामाचे ई-भूमिपूजन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले.
अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत होणाऱ्या शहर पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामाचे ई-भूमिपूजन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित केलेल्या लाइव्ह कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपमहापौर वैशाली शेळके, आयुक्त अजय लहाने, भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, डॉ. किशोर मालोकार, माजी आ.डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, योगीता पावसाळे, मंजूषा शेळके, सारिका जयस्वाल, उषा विरक, जान्हवी डोंगरे, शाहीन अंजूम मेहबूब खान, सुनीता मेटांगे, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, भाजपचे गटनेता राहुल देशमुख, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, अनिल गरड, आशीष पवित्रकार, विनोद मापारी, उपायुक्त समाधान सोळंके, उपायुक्त सुरेश सोळसे, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे उपस्थित होते.
कार्यक्रमाला दोन तास विलंब
मनपाने ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता पार पडणार असल्याचे नमूद केल्याने नियोजन भवनमध्ये महापौर विजय अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया तसेच नगरसेवक वेळेवर दाखल झाले. प्रत्यक्षात मुंंबईत हा कार्यक्रम दोन तास उशिराने १२.३० वाजता सुरू झाला.
मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
‘अमृत’ योजनेचा ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केला. त्यानुषंगाने मजीप्राचे अभियंता अजय मालोकार यांनी महान धरण ते अकोला शहरापर्यंतची १६१ किमीची मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात २६५ किमीची नवीन जलवाहिनी टाकण्यासह विविध भागात आठ जलकुं भ उभारणार असल्याची माहिती दिली.