सिव्हिल लाइन ठाणेदाराची उचलबांगडी
By admin | Published: December 1, 2014 12:29 AM2014-12-01T00:29:20+5:302014-12-01T00:29:20+5:30
पोलीस अधीक्षकांचा फोन न उचलणे भोवले.
अकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांची पोलीस अधीक्षकांनी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केलेला फोन न उचलल्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची पोलीस वतरुळात चर्चा आहे. ठाणेदार यांच्या जागेचा प्रभार बाश्रीटाकळीचे ठाणेदार डी. डी. ढाकणे यांच्याकडे सोपविण्यात आला.
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार हे काही दिवसांसाठी सुटीवर गेले होते. सुटीदरम्यान त्यांना पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला; परंतु सावकार यांनी हा फोन न उचलल्यामुळे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी तडकाफडकी निर्णय घेत, त्यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार सावकार हे सुटीवर असल्याने त्यांच्याकडील प्रभार हा बाश्रीटाकळीचे पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्याकडे सोपविला आहे. ढाकणे हे दोन ते तीन महिन्यांपूर्वीच बाश्रीटाकळी येथे ठाणेदारपदी रुजू झाले होते. सावकार यांच्या बाबतीत पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे पोलीस खात्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांचा फोन न उचलल्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याची पोलीस खात्यात जोरदार चर्चा रंगली आहे; परंतु सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी काहीच बोलायला तयार नाहीत आणि याबाबत आपल्या कानावर हात असल्याचेही काही अधिकारी व कर्मचार्यांनी स्पष्ट केले.