उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध, आमदार देशमुख, पोलिसांमध्ये बाचाबाची
By नितिन गव्हाळे | Published: October 7, 2023 07:02 PM2023-10-07T19:02:29+5:302023-10-07T19:03:06+5:30
महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्यात आले होते.
अकोला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना जुने शहर पोलिसांनी स्थानबद्ध करून शिवसैनिकांना राजराजेश्वर मंदिरात रोखून धरले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे आमदार नितीन देशमुख व पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. शहरात अवैध धंदे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी, शिवसैनिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात. अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल का करीत नाही? असा संतप्त सवाल आमदार नितीन देशमुख यांनी केला.
महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्यात आले होते. मनपातील मालमत्ता कराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी जाणार होते. त्यापूर्वी शिवसैनिक राजराजेश्वर मंदिरात गेले.
याठिकाणीच जुने शहर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. याची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ राजराजेश्वर मंदिरात पोहोचले आणि शिवसैनिकांना का स्थानबद्ध केले? असा सवाल त्यांनी केला. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर आमदार देशमुख यांनी संतप्त होत कोणत्या कलमांखाली गुन्हे दाखल करणार?, शहरात अवैध धंदे तुम्हाला दिसत नाहीत? आधी त्यांच्यावर कारवाई करा. असे प्रश्न केले. आमदार देशमुख व पोलिसांदरम्यान झालेल्या वादावादीमुळे तणाव निर्माण झाला होता.