एसपींकडून क्लीन चीट, डीवायएसपी म्हणतात, जामीन नको!
By admin | Published: April 28, 2017 02:01 AM2017-04-28T02:01:31+5:302017-04-28T02:01:31+5:30
चिमुकलीचे लैंगिक शोषण: चेहरा साधर्म्यामुळे युवकाला पकडले!
अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्सच्या छतावर दहा वर्षीय चिमुकलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंध नसतानाही केवळ चेहरा साधर्म्यामुळे मुख्य आरोपी सोडून निर्दोष युवक प्रवीण ऊर्फ पड्या चव्हाण याला अटक केली; परंतु नंतर पोलीस अधीक्षकांनी प्रवीण हा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी नसल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट केले; मात्र पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी प्रवीणने केलेला जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर करावा, अशी विनंती केली. पोलिसांच्या चुकीमुळे एका निर्दोष युवकावर संकट ओढावल्यानंतरही पोलीस त्याच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळत असल्याचे हे उदाहरण आहे.
एका दहा वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर नेऊन निर्जनस्थळी तिच्यावर नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. रामदासपेठ पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपींची धरपकड सुरू केली. संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण (रा. माळीपुरा) यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध भिकारी गोविंद साखरे याला अटक केली. त्याच्याकडून मुख्य आरोपींची नावे मिळाली. पोलिसांनी मुख्य आरोपी व प्रवीणच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य असल्याने त्याला अटक करावी लागली. त्याचा घटनेशी संबंध नाही, असे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले होते. पोलिसांच्या चुकीमुळे निष्पाप प्रवीण चव्हाणला विनाकारण पोलीस कारवाईला सामोरे जाऊन गजाआड व्हावे लागले. प्रवीण सध्या कारागृहात असून, त्याने अॅड. केशव एच. गिरी यांच्या माध्यमातून न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला; परंतु न्यायालयाने त्यावर पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यावर पोलीस अधीक्षक उमेश माने पाटील यांनी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली. पोलीस अधीक्षक एकीकडे प्रवीणला निर्दोष ठरवितात, तर दुसरीकडे त्यांचेच पोलीस उपअधीक्षक प्रवीण पीडित मुलीस धमकावू शकतो, तपासामध्ये हस्तक्षेप करून पुरावे नष्ट करू शकतो, असे म्हणून त्याला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, हे हास्यास्पद आहे.