‘स्वच्छ सर्वेक्षण’; अकोला मनपा देशात ६६ व्या क्रमांकावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:03 AM2020-08-21T11:03:18+5:302020-08-21T11:03:28+5:30
अकोला महापालिकेला देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यात मनपाने २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ मध्ये अकोला महापालिकेला देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यात मनपाने २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१९ मधील स्वच्छ सर्वेक्षणच्या निकालात देशात मनपाचा २१७ वा क्रमांक होता. त्या तुलनेत ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदारीमुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये महापालिकेला हगणदरीमुक्त शहराचा दर्जा प्राप्त झाला होता. यानंतर वेळोवेळी राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८, २०१९ व आता २०२० मधील अभियानांतर्गत शहरामध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यास संदर्भात शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. या अभियानात राज्यातील महापालिका सहभागी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय) पथक शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले असता स्वच्छतेबाबत नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनातर्फे केल्या जाणाºया उपाययोजनांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. त्यानुषंगाने संपूर्ण देशातून महापालिकेला ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यातून २१ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ मध्ये २१७ वा क्रमांक
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१९’ मध्ये सहभागी झालेल्या मनपाला देशातून २१७ वा क्रमांक मिळाला होता. यादरम्यान, प्रशासनाने स्वच्छतेच्या मुद्यावर विविध उपाययोजना केल्याचे परिणाम यंदा समोर आले असून, देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
स्वच्छतेच्या संदर्भात मनपातर्फे घरोघरी कचरा जमा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून उचलल्या जातो. नागरिकांनी उघड्यावर कचरा न फेकता वाहनात जमा करावा. परिसरात स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
- अर्चना मसने, महापौर