अकोल्यात साफसफाईचा फज्जा ; धुळीने माखले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 11:47 AM2021-11-07T11:47:10+5:302021-11-07T11:47:17+5:30
Akola News : साफसफाईच्या मुद्यावर स्वच्छता विभाग कुंभकर्णी झाेपेत असल्याचे परिणाम अकाेलेकरांना भाेगावे लागत आहेत.
अकाेला : ऐन दिवाळीच्या दिवसांत साफसफाईच्या कामाचा पुरता फज्जा उडाला आहे. शहराच्या प्रत्येक भागात रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र शनिवारी कायम हाेते. साफसफाईच्या मुद्यावर स्वच्छता विभाग कुंभकर्णी झाेपेत असल्याचे परिणाम अकाेलेकरांना भाेगावे लागत आहेत. रस्त्यांची नियमित झाडपूस हाेत नसल्याने धुळीमुळे लहान मुलांपासून ते वयाेवृध्दांपर्यंत श्वसनाचे विकार जडत आहेत. मनपा आयुक्त कविता द्विवेदी अस्वच्छतेची समस्या गांभीर्याने घेतील का, असा सवाल उपस्थित हाेऊ लागला आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिवाळीपूर्वीच कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले. तसेच १ नाेव्हेंबर राेजी मनपाच्या मुख्य सभागृहात आयाेजित विशेष सभेत सातवा वेतन आयाेग लागू करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामाेर्तब केले. आयुक्तांच्या स्तरावर कर्मचाऱ्यांचे हित जाेपासल्या जात असतानाच दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कर्तव्याचा विसर पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत साफसफाईच्या कामाची ऐशीतैशी झाली आहे. शहराच्या काेणत्याही भागात फेरफटका मारल्यास रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठ असाे वा प्रभागांमध्ये अंतर्गत भागात प्रचंड अस्वच्छता व घाण पसरल्याची परिस्थिती आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्य असाे वा अंतर्गत रस्त्यांची दरराेज झाडपूस करणे क्रमप्राप्त आहे; परंतु, तसे हाेत नसल्यामुळे रस्त्यांवर मातीचे थर साचले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा मानसिक व शारीरिक त्रास अकाेलेकरांना हाेऊ लागला आहे.
अकाेलेकरांनी टॅक्स का भरावा?
मागील काही दिवसांपासून आयुक्त कविता द्विवेदी कर्मचाऱ्यांच्या हिताबाबत आग्रही असल्याचे दिसून आले आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग लागू केल्यानंतरही शहरात सणासुदीच्या दिवसांत अस्वच्छता आढळून येत असेल तर अकाेलेकरांनी मालमत्ता कर का जमा करावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धुळीमुळे अकाेलेकर त्रस्त असून झाेपेचे साेंग घेतलेल्या स्वच्छता व आराेग्य विभागाला आयुक्त द्विवेदी वठणीवर आणतील का, याकडे मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या सुज्ञ अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे.
सर्व काही नगरसेवकांच्या मनासारखे तरीही...
तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांनी बंद केलेले पडीक वाॅर्ड व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची सेवा आयुक्त कविता द्विवेदी यांनी पूर्ववत केली. कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरची यंत्रणा कायम ठेवली. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या दबावापाेटी म्हणा किंवा डाेक्याला कटकट नकाे या उद्देशातून आयुक्त द्विवेदी यांनी साफसफाईची यंत्रणा जैसे थे केली. सर्व काही नगरसेवकांच्या मनाप्रमाणे झाल्यानंतरही अकाेलेकरांना अस्वच्छतेचा व धुळीचा सामना करावा लागत आहे, हे येथे उल्लेखनीय.