स्वच्छता अॅपच्या सर्वेक्षणात अकोला शहर माघारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:56 PM2019-01-08T13:56:56+5:302019-01-08T13:57:36+5:30
अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत
अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत. ४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला प्रारंभ केला असता विदर्भातील जिल्ह्यांमधील ११ शहरांना पहिल्या शंभर क्रमांकात स्थान नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अकोला महापालिका २५९ व्या स्थानावर असून, अमरावती महापालिक ा १३० व्या स्थानावर आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी यंदा केंद्राच्या चमूने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ५ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला ४ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, स्वच्छता अॅपच्या वापरासाठी ४०० गुण आहेत. स्वच्छता अॅप किती नागरिकांनी डाउनलोड केले, त्याचा किती जणांना वापर केला, अभिप्राय काय दिला, आदी घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४ हजार शहरांचे ‘डायनॅमिक रॅकिंग’ ठरविण्यात येते. ११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी स्वच्छता अॅपचा किती प्रमाणात वापर केला, नागरिकांच्या समस्यांचे प्रशासनाने निराकरण केले का व त्यानंतर तक्रारकर्त्याने काय अभिप्राय दिला, आदी घटकांसाठी ४०० गुण प्राप्त होतील. केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने ४ जानेवारीपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अमरावती महापालिका १३० व्या क्रमांकावर असून, अकोला महापालिका २५९ क्रमांकावर असल्याची माहिती आहे.
केंद्राची चमू अकोल्यात!
‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेंतर्गत तपासणीसाठी केंद्र शासनाची चमू मागील दोन दिवसांपासून शहरात दाखल आहे. शहरात तुंबलेल्या नाल्या, कचऱ्याचे ढीग पाहता ५ हजार गुणांपैकी मनपाला किती गुण प्राप्त होतील, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.