महापालिका परिसरातच स्वच्छता मोहीमेची गरज

By admin | Published: June 25, 2017 08:30 AM2017-06-25T08:30:09+5:302017-06-25T08:30:09+5:30

पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.

Cleanliness campaign needed in the municipal area | महापालिका परिसरातच स्वच्छता मोहीमेची गरज

महापालिका परिसरातच स्वच्छता मोहीमेची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला महापालिका कार्यालय परिसरातच स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे चित्र दिसत असून, याकडे पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनची मोहीम देशभरात सुरू केली आहे. त्या मिशनची दखल घेत अकोल्यातही स्वच्छता मोहीम राबविण्याच्या कामास गती मिळत आहे. त्या दिशेने शेकडो वाहने अलीकडे प्रत्येक प्रभागातील परिसरात दररोज दारोदारी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. महानगर स्वच्छ करीत असताना मात्र महापालिकेचे आपल्या कार्यालय परिसराकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या कक्षाजवळ आणि महापालिकेच्या बंद असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर गत अनेक दिवसांपासून अतिक्रमण विभागाने उचलून आणलेले भंगार आणि कचरा पडून आहे.
पालिकेच्या विविध कक्षातील केरकचरा, प्लास्टिकचे वेस्टेज ग्लास, गुटखा पुड्यांचा कचरा या परिसरात साचलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा कचरा येथे पडलेला असला, तरी त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी अजून तरी कुणी उचललेली नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी कार्यालय परिसरातच आता स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

Web Title: Cleanliness campaign needed in the municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.